वडवणी : लग्नाच्या आमिषाने एक तरुणाला साडेएक लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वडवणीत उघडकीस आला आहे. विवाह जमविण्याच्या बहाण्याने वधू दाखवून घेतलेल्या पैशांनंतर लग्न लावण्यात आले. परंतु काही दिवसांतच वधूला आईसोबत परत नेण्याचा प्रयत्न केला असता, संपूर्ण प्रकरण फसवेगिरीचे असल्याचे उघड झाले. या प्रकारामागे तब्बल नऊ जणांची टोळी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
वडवणीतील तरुणाला घातला पावणेदोन लाखांचा गंडा; नऊ जणांवर गुन्हा
ज्ञानेश्वर दत्तात्रय रोमन (वय 29, रा. पावरलूम वस्ती, वडवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची ओळख दाजी भागवत गायकवाड यांच्या माध्यमातून महादेव जनार्धन घाटे यांच्याशी झाली. घाटे याने ज्ञानेश्वरला लग्नासाठी मुलगी पाहण्याची व्यवस्था केली. 10 ऑगस्ट 2025 रोजी घाटे व त्याचे साथीदार राधा कैलास जाधव या नावाची एक मुलगी घेऊन ज्ञानेश्वरच्या घरी आले. यावेळी ओळख करून दिल्यानंतर लग्न ठरविण्यात आले. मात्र मुलीकडील मंडळींनी लग्नासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. शेवटी एक लाख सत्तर हजार रुपयांमध्ये सौदा ठरला.
लग्न होण्याच्या आशेने ज्ञानेश्वरने एक लाख रुपये रोख जनार्धन थोरात याला दिले. पैशांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तसेच उर्वरित रक्कम फोन पे द्वारे विविध खात्यांवर पाठवण्यात आली. यानंतर रात्री अकराच्या सुमारास राधा कैलास जाधव हिच्याशी ज्ञानेश्वरचे लग्न लावून देण्यात आले. 18 ऑगस्ट रोजी वधूच्या आईने फोन करून मुलीला परत बोलवण्यासाठी गाडी पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर सोमेश वाघमारे आणि प्रियांका बाफना हे दोघे राधाला घेण्यासाठी आले. ज्ञानेश्वरला यया सर्व हालचालींचा संशय आल्याने त्याच्या खबरीनंतर सर्वांना थेट वडवणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान वधूचे नाव खरे नाव राधा मुन्ना शर्मा असून तिचा पत्ता जालना असल्याचे निष्पन्न झाले आणी लग्नाचे संपूर्ण प्रकरण फसवे असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी ज्ञानेश्वरच्या फिर्यादीवरून महादेव घाटे, कैलास दळवी, जनार्धन थोरात, वनमाला शर्मा, राधा शर्मा, माधुरी फिरोज खान, सोमेश वाघमारे, प्रियांका बाफना आणि एक अज्ञात महिला अशा नऊ जणांविरोधात संगनमत करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी मुलं मिळत नसल्याने लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना मुली दाखवते, लग्न लावून देते व नंतर बहाण्याने वधू परत नेत त्यांच्या विश्वासाला तडा देते, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दादासाहेब उबाळे करत आहेत.