Breaking
Updated: ऑगस्ट 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : धर्मांधता आणि संघर्षाला खतपाणी घालणाऱ्या घटनांमध्ये सतत वाढ होत असताना अंबाजोगाईतील मुस्लीम समाजाने धार्मिक एकोप्याचा आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून देत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद पाच दिवस उशिरा साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला. यासोबतच मिरवणुकीत डीजे न वापरण्याचा स्तुत्य संकल्प देखील मुस्लीम समाजाकडून जाहीर करण्यात आला.
या वर्षी ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद तर ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा गणेश विसर्जन सोहळा आहे. या दोन वेगवेगळ्या धर्मीय सणांमध्ये केवळ एका दिवसाचे अंतर असल्याने गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर ताण येण्याची शक्यता होती. मात्र, मुस्लीम समाजाने पुढाकार घेत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांची भेट घेत आपला निर्णय कळविला. यानुसार अंबाजोगाई शहरात ईद-ए-मिलाद १० सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.
अंबाजोगाई शहर हे नेहमीच सामाजिक सलोख्याचे उदाहरण राहिले आहे. शहरात आजवर कधीही धार्मिक तणावाची तीव्र परिस्थिती उद्भवलेली नाही. दोन्ही समाज परस्परपूरक निर्णय घेत एकोपा जपत आले आहेत. यावेळीसुद्धा त्याच परंपरेचे दर्शन घडले. अंबाजोगाई शहरातील हा सामंजस्यपूर्ण निर्णय हा सामाजिक ऐक्याचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा जिवंत आदर्श ठरला आहे.
यासंदर्भात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आणि महावितरणचे कनिष्ठ अभियंता कराड उपस्थित होते. बैठकीत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी मार्गावरील अडथळे दूर करण्याचे आश्वासन अनंत वेडे यांनी दिले. तर, मिरवणुकीदरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची हमी कराड यांनी दिली.
या बैठकीत मुस्लीम समाजाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेचा वापर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरला असून धार्मिक मिरवणुकांमध्ये वाढणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी हा आदर्श ठरावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे अंबाजोगाई शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की सलोखा, परस्पर आदर आणि शांततेतूनच खरी प्रगती साधता येते. दोन्ही धर्मीय समाजांच्या या सहकार्यामुळे शहराचा सामाजिक ऐक्याचा वारसा अधिक दृढ झाला आहे.