बीड : गुन्हेगारी तपास अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी बीड पोलिसांनी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत ‘डीप आय’ नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे गुन्हेगारांची माहिती, दाखल गुन्ह्यांचा तपशील, फोटो, तसेच गुन्ह्याशी संबंधित डेटाचा विश्लेषण एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित हे ॲप महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात प्रथमच पोलिसांनी विकसित केल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘एआय’चा प्रभावी वापर; देशातील पहिला पथदर्शी उपक्रम
या ॲपच्या मदतीने खून, दरोडा, चोरी, मारामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला योग्य दिशा मिळणार आहे. घटनास्थळाची माहिती दिल्यास तत्सम गुन्ह्यांचा डेटा ॲप दाखवेल, ज्यामुळे तपासाची गती वाढेल. तसेच कॉल रेकॉर्ड्स (सीडीआर), कॉल ॲनालिसिस आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषणही या ॲपमधून करता येईल.
या ॲपचा यशस्वी वापर व्हावा म्हणून सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात ॲप कसे वापरायचे, डेटा कसा अपडेट करायचा आणि एआयच्या मदतीने तपासाची दिशा कशी ठरवायची हे शिकवले जाईल.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १७ सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता असून, महाराष्ट्र पोलिस दलासाठीच नव्हे तर देशभरातील पोलिसांसाठी तो पथदर्शी ठरणार आहे.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले की, “डीप आय ॲप हे गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. या तंत्रज्ञानामुळे तपासाची गती वाढेल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल.”