Breaking

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते महेश शिंदे यांचा बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात झंझावाती दौरा

जिल्ह्यात झंझावाती दौरा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते, तसेच माणुसकी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश भाऊ शिंदे यांनी बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये झंजावती दौरा केला. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

या दौर्‍याचा उद्देश मराठवाड्यातील शेतकरी, महिला, युवक, मजूर आणि वंचित घटकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर सामाजिक व शासकीय स्तरावर उपाययोजना करणे आणि पक्ष संघटन बळकट करणे असा होता. अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महेश शिंदे यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा करताना महेश शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घेत, सामाजिक न्यायाची दिशा अधिक दृढपणे मांडली. यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी सांगितले की, ‘माणुसकी सेवा ही आमची नांदी आहे. या नांदीतूनच परिवर्तन घडवणार आहोत.’ माणुसकी सेवा फाउंडेशनच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि भविष्यातील योजना यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यात त्यांनी राजकिशोर मोदी यांच्या सहकार कार्यालयात भेट देऊन शहरातील नागरी समस्या व पक्ष संघटन या विषयावर चर्चा केली.

ममदापूर (पाटोदा) येथे शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या :
पुढे पाटोदा (ममदापूर) येथील खांडसरी कारखान्याला भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब देशमुख, सरपंच अविनाश उगले, व्यंकटराव बावणे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव मुळे, श्रीकांत देशमुख यांच्यासह ममदापूर, धानोरा, पाटोदा, देवळा व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

देवळा (अंबाजोगाई) येथे उमटविला सामाजिक संवेदनशीलतेचा ठसा :
या दौऱ्यात अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावालाही महेश भाऊ शिंदे यांनी भेट दिली. गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. जमलेल्या ग्रामस्थांशी विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करताना त्यांनी विशेषतः गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे ठोस आश्वासन दिले. ‘सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आणि त्यांच्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित दादांच्या माध्यमातून, तसेच माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे सोडवण्याचे काम मी करत राहीन,’ असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, ‘मराठवाड्यातील जनतेशी सतत थेट संपर्कात राहणे हेच माझे कर्तव्य आणि ध्येय आहे.’ यावेळी श्रीकृष्ण पवार, सुधाकर पवार, तात्या सस्ते, सतीश पवार, मोहन पवार, शरद पवार, आण्णासाहेब पवार हे उपस्थित होते

लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे महिलांशी संवाद :
मुरूड (लातूर) येथे बचत गटाच्या महिलांसोबत विशेष चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरण, ग्रामीण उद्योग निर्मिती, शासकीय योजना याबाबत माणुसकी सेवा फाऊंडेशनची भूमिका स्पष्ट करताना महेश शिंदे यांनी सांगितले की, ‘कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीसाठी महिलांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागातील महिला आजही पूर्णपणे सक्षम झालेल्या नाहीत, त्यामुळे महिला सक्षमीकरणावर भर देणे काळाची गरज आहे.’
या कार्यक्रमाला रेश्मा शेख, रवी उबाळे तसेच अनेक बचत गटांच्या महिला प्रमुख उपस्थित होत्या.

धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे “माणुसकी संवाद” :
दौर्याच्या पुढील टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक तेर गावाला भेट देत, महेश भाऊ शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.ते म्हणाले, ‘या समस्या फक्त ऐकून घेण्यासाठी नाहीत, तर वैयक्तिक लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी मी स्वतः पुढे येणार आहे. समाजाच्या सर्व थरांना बरोबर घेऊन ‘माणुसकी सेवा फाऊंडेशन’ मराठवाड्यात गावोगावी, वाड्यावस्त्यांवर कार्यरत होईल.’ या कार्यक्रमात प्रवीण सोळंके, पत्रकार बंधू व त्यांच्या टीमने आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक आणि विविध वृत्तपत्रांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माणुसकी सेवा फाऊंडेशनच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली आहे. ग्रामीण वस्तीपर्यंत पोहोचून पक्ष बळकटीकरणाची दिशा ठरविणाऱ्या या दौऱ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी माणुसकी सेवा फाऊंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश वेदपाठक, बीड जिल्हाध्यक्ष, अंकुश गंगावणे, संजय तेलंग, शेख नासीर भाई, सय्यद अमजद भाई आणि सर्व बीड जिल्ह्यातील माणुसकी सेवा फाऊंडेशन टीम यांनी प्रयत्न केले.

Last Updated: June 30, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा