Breaking

बीड लैंगिक शोषण प्रकरणाची SIT चौकशी

बीड लैंगिक शोषण प्रकरणाची SIT चौकशी


महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बीड येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. प्रस्तुत प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, असे ते म्हणालेत.

भाजप सदस्य चेतन तुपे यांनी बीडमधील लैंगिक शोषणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य या महाराष्ट्रात घडले आहे. बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्यावर पोस्कोचा गुन्हाही दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सरकारने या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी केली एसआयटी चौकशीची घोषणा

मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले की, सभागृहाचे सदस्य चेतन तुपे यांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेचा मुद्दा उपस्थित केला. कोचिंग क्लासेसला येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यातील एका पीडित मुलीने व तिच्या आईने हिंमतीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाची वस्तुस्थिती बाहेर आली. या अंतर्गत पोस्को कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन्माननीय सदस्याने या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित केलेत. या प्रकरणी आरोपींची दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याची चौकशी केली जाईल. या प्रकरणी बीडसह संपूर्ण राज्यात रोष पसरला आहे. कारण, या प्रकरणाची व्याप्ती अधिकची असू शकते. एक मुलगी हिंमतीने पुढे आली, पण ही घटना अनेक मुलींसोबत घडल्याचा संशय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती व संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक एसआयटी चौकशी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास केला जाईल.

नराधमांना कठोर शिक्षा मिळेल

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? कुणाचा वरदहस्त आहे का? याला राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? आदी तपास या प्रकरणी केला जाईल. त्यातून पीडित मुलींना योग्य न्याय मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी सभागृहाला व सदस्यांना ग्वाही देतो की, या प्रकरणातील एसआयटी कालबद्ध तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. पीडित मुलींना न्याय देईल. तसेच अशा प्रकारच्या नराधमांना कठोर शिक्षा मिळेल. एवढेच नाही तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शिक्षा मिळेल अशी व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पीडितेने बालकल्याण समितीसमोर सांगितला गुन्ह्यातील घटनाक्रम, आई-वडील रडले‎

दुसरीकडे, या प्रकरणातील पीडित मुलीने बालकल्याण समितीपुढे आपल्यावरील आपबीती कथन केली आहे. ती म्हणाली, शिक्षक खाटोकरने मला केबिनमध्ये बोलावून ‎बॅड टच केला. त्यामुळे मी प्रतिकार केला,‎त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. पण तो ऐकत‎ नव्हता. त्याने मला कपडे काढायला लावले,‎ माझे फोटोही काढले. सहनशीलतेचा अंत झाला‎ म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली. त्याला अद्दल ‎घडली पाहिजे. पोटच्या मुलीचा झालेला हा छळ ऐकून‎ तिचे आई, वडिलही धाय मोकलून रडले.‎

सोमवारी पीडीतेला बालकल्याण ‎समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी तिने ‎‎समितीसमोर सगळा घटनाक्रम उलगडला.‎ खाटोकर याने तिला सर्वाधिक त्रास दिला.‎ वर्गातही इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचे माझ्याशी‎ वागणे चांगले नव्हते. हिने मला एक प्रश्न‎ विचारला आहे त्याचे उत्तर मी देणार आहे असे ‎‎म्हणून तो क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावत होता. तो ऐकत नव्हता, तर विजय‎ पवारने हाच प्रकार केल्याचे पीडीता म्हणाली.‎

पीडितेस महिला सहायक‎

बालकल्याण समितीने पीडीतेची‎ स्थिती पाहून तिला एक महिला‎ सहायक दिली आहे. तिचे समुपदेशन ‎करुन धक्क्यातून बाहेर पडण्यास‎ मदत करणे, करिअरच्या दृष्टीने मदत‎ करणे, आत्मविश्वास उंचावणे,‎ कायदेशीर मदत ही कामे महिला‎ सहायक करेल. या निर्णयामुळे‎ पीडीतेला मदत होईल.‎

Last Updated: July 1, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा