Breaking
अंबाजोगाई : शासनाच्या “आपले सरकार सेवा केंद्र” या जनतेसाठीच्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून जात प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली असून, सचिन अंजान यांच्या केंद्राचा परवाना उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांनी तात्काळ रद्द केला आहे.
बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रिया झांबरे यांनी उपविभागीय अधिकारी वजाळे यांच्याकडे व्हॉट्सअॅपद्वारे अंबाजोगाई येथील सेतू सुविधा केंद्रावरून अतिरिक्त पैशांची मागणी केल्याची तक्रार केली होती. त्यांनी यासंदर्भात संबंधित केंद्राचा व्हिडिओ पुरावा स्वरूपात सादर केला होता. सदर तक्रारीची गंभीर दखल घेत, वजाळे यांनी सोमवारी तीन केंद्राचा परवाना रद्द केला तर एका अवैध केंद्राच्या चालकावर फौजदारी कारवाई केली. सोमवारी 30 जून रोजी सचिन अंजान यांचे केंद्र बंद असल्याचे दिसून आल्याने पंचनामा करण्यात आला. त्यानंतर 1 जुलै रोजी पुन्हा भेट देऊन केंद्राची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान केंद्रात गंभीर अनियमितता आढळून आली. या केंद्रातून जात प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत सदर सदरील “आपले सरकार सेवा केंद्र”चा परवाना तात्काळ रद्द करण्याचा आदेश दिला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी वजाळे यांनी पाच आपले सरकार सेवा केंद्रावर केलेल्या धडक कारवायांमुळे नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अशा केंद्रातून होणार्या लुटमारीला आळा बसेल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Last Updated: July 1, 2025
Share This Post