Breaking
Updated: जून 1, 2026
25 लक्ष वृक्ष लागवड महाअभियान : निसर्ग पुनरुज्जीवनाची ऐतिहासिक हाक!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) – उन्हाळ्यातील वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेले पर्यावरणीय संतुलन ही आजच्या काळातील सर्वात मोठी चिंता बनली आहे. अशा परिस्थितीत केवळ चर्चा नव्हे, तर कृतीची गरज आहे. हीच गरज ओळखून जलनायक मयंक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल विकास ट्रस्ट यावर्षी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तब्बल 25 लक्ष वृक्ष लागवड व संवर्धन महाअभियान राबवत आहे. दिनांक 23 ते 29 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर विक्रमी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी परळी वैजनाथ येथील कृषीकुल येथे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पर्यावरणप्रेमी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची विस्तृत नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, गावागावात लोकसहभाग वाढविणे तसेच लागवड केलेली झाडे दीर्घकाळ जगविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगविणे आणि वाढविणे हेच या अभियानाचे मुख्य ध्येय असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सर्वाधिक झाडे जिवंत ठेवणाऱ्या आणि पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गावागावात पर्यावरण चळवळीला नवे बळ मिळणार असून स्पर्धात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार आहे.
जलनायक मयंक गांधी यावेळी बोलतांना म्हणाले की, आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण पुढील पिढीसाठी काय देणार आहोत? प्रदूषण, दुष्काळ आणि उष्णतेचा वारसा की हिरवीगार, समृद्ध आणि जीवनदायी पृथ्वी? याचे उत्तर आपल्या हातात आहे. एक व्यक्ती एक झाड, एक कुटुंब दहा झाडे आणि एक गाव हजारो झाडे या संकल्पनेतूनच पर्यावरण परिवर्तनाची मोठी चळवळ उभी राहू शकते. ग्लोबल विकास ट्रस्टने या महाअभियानात नागरिक, युवक, महिला बचत गट, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींना स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वतः सहभागी व्हा, इतरांना प्रेरणा द्या आणि निसर्ग संवर्धनाच्या या ऐतिहासिक मोहिमेचा भाग बना. महाअभियानात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9558488686 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.