Breaking

केजमध्ये गोवंश कत्तलखान्याचा पर्दाफाश; मध्यरात्री पोलिसांचा छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

मध्यरात्री पोलिसांचा छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: शहरालगत असलेल्या अल्लाउद्दीन नगर परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर केज पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली आहे. या धाडसी कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले असून ५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान ३० जनावरांना जीवदान दिले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे हे १४ मे २०२६ रोजी रात्री गस्त घालत असताना त्यांना अल्लाउद्दीन नगर येथील नाल्याजवळ जनावरांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने १५ मे रोजी पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जफर गफार खुरेशी (वय ४० वर्षे) आणि आयान सलीम खुरेशी (वय १९ वर्षे, दोन्ही राहणार रोजा मोहल्ला, केज) हे हातामध्ये कुऱ्हाड आणि चाकू घेऊन जनावरांची कत्तल करताना पोलिसांना मिळून आले. आरोपींकडे जनावरांच्या कत्तलीबाबत कोणताही वैध परवाना नव्हता.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३० जिवंत जनावरे, कत्तल केलेल्या अवस्थेतील एक गाय, दोन दुचाकी आणि कत्तलीसाठी लागणारे विविध साहित्य असा एकूण ५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील संगोपनासाठी कानडीमाळी येथील गो-शाळेत सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. मयत जनावर आणि मांसाची केज नगर पंचायतीच्या मदतीने दफन करून विल्हेवाट लावण्यात आली आहे.

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts