Breaking

वडवणीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

बुक्की मारून पाडले दोन दात, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात जगताप पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात पकडले असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना शहरातील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी एका डम्मी ग्राहकाला १५०० रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठवले. डम्मी ग्राहकाने इशारा करताच पथकाने १७:०० वाजण्याच्या सुमारास तिथे छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी रतन गंगाराम बनसड (वय ३२, राहणार पिंपळनेर, तालुका बीड) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून डम्मी ग्राहकाने दिलेले पैसे जप्त केले आहेत. मात्र, जागेचे मालक गजानन राधाकिसन गार्डी आणि त्याची बहीण सत्वशिला भुते (दोन्ही राहणार वडवणी) हे पोलिसांना पाहून पळून गेले. घटनास्थळावरून पोलिसांनी बीड आणि अकोला जिल्ह्यातील तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. आरोपी पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यावर आपली उपजीविका करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत कप्पे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. वडवणी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts