Breaking

दुचाकीच्या धडकेत मजुराचा दुर्दैवी अंत; अंबाजोगाईत अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

Updated: मे 15, 2026

By Vivek Sindhu

दुचाकीच्या धडकेत मजुराचा दुर्दैवी अंत; अंबाजोगाईत अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: चनई परिसरात एका दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुण मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेबाबत नागडगांव येथील अशोक देवराव मिरगे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ मोकिंदा मागील दोन वर्षांपासून दगडवाडी येथील डॉ. धर्मपात्रे यांच्या शेतात मजुरीचे काम करत होता. १० मे २०२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मोकिंदा आपली दुचाकी क्रमांक MH44AH2955 वरून जात असताना चनई येथील सावरे हॉटेलसमोरील पुलावर हा अपघात झाला. समोर चालणाऱ्या बजाज डिस्कव्हर दुचाकी क्रमांक MH44L5694 च्या चालकाने अचानक ब्रेक दाबून हयगयीने वाहन वळवले. यामुळे मोकिंदा यांच्या दुचाकीची त्याला जोरात धडक बसली आणि ते खाली पडून गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर उपस्थित लोकांनी मोकिंदा यांना तातडीने अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने ११ मे २०२६ रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताला अज्ञात दुचाकी चालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद बाबूराव जोगदड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश मारोती भोळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts