Breaking
Updated: मे 14, 2026
जुन्या तक्रारीचा राग; निवृत्त अभियंत्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला, अंबाजोगाईत दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: पुतण्याने पोलिसांत दिलेली तक्रार मागे का घेतली नाही, या कारणावरून एका ६० वर्षीय निवृत्त अभियंत्यावर तीक्ष्ण हत्याराने आणि लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना अंबाजोगाईत घडली आहे. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भिमराव वामनराव सरवदे हे जलविज्ञान प्रकल्प उपविभाग, अंबाजोगाई येथून निवृत्त झाले असून ते टिळकनगर भागात राहतात. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते यशवंतराव चव्हाण चौकातील ज्योतिबा हॉटेलसमोर उभे होते. यावेळी मनोज वसंतराव घोडके आणि शुभम बनसोडे तेथे आले. मनोजच्या हातात तीक्ष्ण लोखंडी हत्यार होते, तर शुभमच्या हातात लाकडी दांडा होता. भिमराव यांच्या पुतण्याने पोलिसांत केलेली तक्रार का मागे घेत नाहीस, असे म्हणत मनोजने त्यांच्या पाठीवर आणि उजव्या हाताच्या तळव्यावर हत्याराने वार करून जखमी केले. तसेच शुभम बनसोडे याने त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या झालेल्या मारहाणीत भिमराव यांच्या खिशातील मोबाईल आणि सातशे रुपये गहाळ झाले आहेत. या घटनेनंतर भिमराव सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब फड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.