Breaking

अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या सोन्याचे साडेचार लाखांची दागिने लंपास

Updated: मे 14, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या सोन्याचे साडेचार लाखांची दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बसस्थानकावर आल्या आणि सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई ते मुरुड बसमध्ये बसल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ ठेवली होती.

याच वेळी बसमध्ये उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘तुम्हाला बसता येत नाही, मी ही बॅग उचलून वर ठेवतो’ असे म्हणत मदतीचा बहाणा केला. बॅग वर ठेवल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला दुसरी गाडी लागली आहे असे सांगून आपल्या दोन साथीदारांसह बसमधून खाली उतरून गेला. मनिषा जगतकर जेव्हा मुरुड येथील आपल्या माहेरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना बॅगेचा आतील कप्पा कशाने तरी कापलेला आढळला. त्यातून सोन्याचे गंठण, लॉकेट, अंगठ्या, बोरमाळ, बांगड्या, कर्णफुले आणि १० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.

या घटनेनंतर मनिषा जगतकर यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts