Breaking

अंबाजोगाईच्या देवळा येथे बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप; उपसरपंचांचा आत्मदहनाचा इशारा

Updated: मे 8, 2026

By Vivek Sindhu

उपसरपंचांचा आत्मदहनाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : तालुक्यातील देवळा येथील गावठाण जमिनीतील वादावरून आता प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमनेसामने आले आहेत. गावठाण हद्दीतील गट नंबर १३१ आणि १३८ मधील जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना, पोलिसांनी बळाचा वापर करून वृक्षतोड केल्याचा खळबळजनक आरोप उपसरपंच दत्ता साळुंके यांनी केला आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास १५ मे रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा साळुंके यांनी दिला आहे.

देवळा येथील गावठाण हद्दीतील गट क्रमांक १३८ व १३१ मधील जमिनीचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. उपसरपंच दत्ता साळुंके यांच्या दाव्यानुसार, न्यायालयाने केवळ जमिनीच्या हद्दी खुणा कायम करून देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून किंवा बळाचा वापर करून त्या जागेवरील मोठी झाडे तोडण्यास मदत केली. ही जमीन वृक्षतोड करून संबंधित व्यक्तीला कसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत आहे, वृक्ष संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, देवळा येथे चक्क पोलीस बंदोबस्तात ही वृक्षतोड कशी झाली?” असा संतप्त सवाल साळुंके यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांनी ही कारवाई कोणत्या आदेशाच्या आधारे केली, त्याचे लेखी पुरावे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात उपसरपंच दत्ता साळुंके यांनी अंबाजोगाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांना लेखी निवेदन दिले आहे. १५ मे पर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन योग्य कारवाई न झाल्यास, गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या प्रकरणावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांची बाजू स्पष्ट केली. “न्यायालयाच्या आदेशानुसारच संबंधित व्यक्तीला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पोलिसांवर करण्यात आलेले आरोप निराधार असून, जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन त्याबाबतचे आदेश आणावेत,” असे त्यांनी सांगितले.


Categories

Recent Posts