Breaking

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, कराडच्या आरोप निश्चितीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर

विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आज, आज होणारी सुनावणी आता 24 जून रोजी पार पडणार आहे. ही सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात होणार होती. आरोपी वाल्मीक कराडविरुद्ध आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद होण्याची शक्यता होती. आजच्या सुनावणीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार होते, मात्र न्यायाधीश अनुपस्थित असल्यामुळे सर्व कारवाई पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणात वाल्मीक कराडसह अन्य आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. मागील सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याने आरोप निश्चिती करण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला होता. दुसरीकडे, वाल्मीक कराडच्या वकिलांनी अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयात नमूद केले. तसेच कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

या प्रकरणाची मागील सुनावणी 3 जून रोजी पार पडली होती. या सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. सुनावणीदरम्यान आरोपी वाल्मीक कराडच्या आरोप निश्चितीबाबत महत्त्वपूर्ण युक्तिवाद करण्यात आला. तसेच, आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल पुरावे मिळावेत यासाठी मागणी करण्यात आली होती. हाच मुद्दा आजच्या सुनावणीत पुन्हा चर्चेला येणार होता. मात्र, विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार आता विराज देशमुख सांगली जिल्ह्यातील रेठेधरण येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेणार आहे. याबाबतचे पत्र वर्षा निवासस्थानी महेश सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार सदाभाऊ खोत यांचीही उपस्थिती होती.

Last Updated: June 17, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा