Breaking

नेकनूरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Updated: एप्रिल 11, 2026

By Vivek Sindhu

स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: नेकनूर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे साठवून ठेवलेल्या ११ गायींची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. कळसंबर रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये या गायींना चारा-पाण्याविना, तोंडे जमिनीला घासतील अशा पद्धतीने आखूड दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा गोवंश जप्त केला असून, आरोपी आरबाज जलाल पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांचे पथक नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आरबाज पठाण याने नगर येथील कत्तलखान्यात पाठवण्यासाठी गायी साठवून ठेवल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तातडीने पंचांसह छापा टाकला असता, तिथे अकरा गायी अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयी स्थितीत आढळून आल्या. या मुक्या प्राण्यांना रात्रीच्या वेळी कत्तलखान्याकडे हलवण्याची तयारी सुरू होती, मात्र पोलिसांनी वेळेत पोहोचून हा प्रयत्न हाणून पाडला.

या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना छळ प्रतिबंधक कायद्यान्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व गायींना सुरक्षिततेसाठी बीड येथील कै. तुकाराम गुरुजी गोधाम प्रकल्पात पाठवण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, महेश विघ्ने, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने फत्ते केली. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Categories

Recent Posts