Breaking
Updated: जानेवारी 6, 2026
वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात - प्रशांत बर्दापूरकर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवाचनसंस्कृती रूजविण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात – प्रशांत बर्दापूरकर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग २६ व्या बालझुंबड मधील प्रश्न मंजुषा (क्विझ कॉम्पिटेशन) स्पर्धा मंगळवार, दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. संयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रश्न मंजुषा (क्विझ कॉम्पिटेशन) स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.डी.गोडसे (विभागप्रमुख, योगेश्वरी प्राथमिक विद्यालय, मेडिकल परिसर) हे तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, प्राचार्य डॉ.तरके, प्राचार्य प्रशांत कुमार (न्यु व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई) आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुज्य सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्ज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजक समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी पत्रकार प्रशांत बर्दापूरकर म्हणाले की, बालझुंबड हे व्यासपीठ विद्यार्थ्यांचे आवडते आहे. यातून साहित्य, कला आणि विज्ञान यांची सांगड घातली आहे. बालझुंबड मधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळते. व्यक्तीमत्व विकास होतो. या स्पर्धेची व्यापकता तालुकास्तरीय आहे. स्पर्धा आवश्यक आहे. फक्त अभ्यास एके अभ्यासच नको तर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी बालझुंबड सारख्या स्पर्धा उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी कथा, कविता व कादंबरी वाचन केले पाहिजे. सामान्यज्ञान प्राप्त केले पाहिजे. ज्ञान संपादन केले पाहिजे असे सांगून प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व बालझुंबड स्पर्धेच्या सातत्यपूर्ण आयोजनाबद्दल संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांचे पत्रकार बर्दापूरकर यांनी कौतुक केले. अध्यक्षीय समारोप करताना डी.डी.गोडसे म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकास घडवून आणणे, प्रगतीसाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. प्रश्नमंजुषा सारख्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि लेखन कौशल्य यांचा विकास होतो. आमच्या काळात ज्ञान संपादन करण्यासाठी पुस्तके आणि वर्तमानपत्रे ही केवळ दोनच साधने उपलब्ध होती आजच्या काळात विज्ञानाने प्रगती केली आहे. आधुनिक युगात विपुल साधने उपलब्ध झाली आहेत. मोबाईलमुळे कर लो दुनिया मुठ्ठी में अशी परिस्थिती आहे. तेव्हा आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नेहमीच जागरूक, सतर्क राहावे. ज्ञानाचा फायदा होतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी ज्ञान संपन्न व्हावे असे आवाहन करून गोडसे यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी क्विझ कॉम्पिटेशन स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती देताना समन्वयक राजेश कांबळे यांनी सांगितले की, क्विझ कॉम्पिटेशन ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल. ही स्पर्धा पुढीलप्रमाणे घेण्यात येईल. यामध्ये सर्वप्रथम आलेल्या सर्व स्पर्धकाची त्यांच्या शालेय अभ्यासक्रमानुसार लेखी परीक्षा ओ.एम.आर. शीट वर घेण्यात येईल. यामधून पहिल्या सहा संघांना निवडून त्यांच्यामध्ये पुढील स्पर्धा घेतली जाईल. यामध्ये सर्वप्रथम सर्व विषयांचे पर्यायांसह प्रश्न विचारले जातील. हे सर्व प्रश्न संघांना मोठ्या पडद्यावर पर्यायांसह दिसतील व ठराविक वेळेतच त्यांना यांचे उत्तर देणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये संघाना चित्र, चित्रफित आणि ध्वनीचा वापर करून त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. शेवटच्या फेरी मध्ये विद्यार्थ्यांना काही मनोरंजक परंतु, त्यांच्या वेळ आणि बुध्दीचा वापर करायला लावणारे खेळ घेऊन मगच सर्व फेरींच्या गुणांची बेरीज करून लगेचच निकाल घोषित केला जाईल असे कांबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय तट यांनी केले तर प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार समन्वयक राजेश कांबळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काटकर सर, अविनाश कापसे, विकास शिंदे, पी.एम.कराड यांच्यासोबत प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
प्रश्नमंजुषा (क्विझ कॉम्पिटेशन) स्पर्धेत ३१ संघ सहभागी :
विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान प्राप्त व्हावे, आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व्हावे, आपला सभोताल आणि जगातील चालू घडामोडी कळाव्यात, आपल्या माहितीच्या कक्षा रूंदावल्या जाव्यात. यासाठी बालझुंबडच्या प्रश्नमंजुषा (क्विझ कॉम्पिटेशन) स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न विचारले होते. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी ५० मिनिटांचा अवधी दिला होता. हि स्पर्धा एकूण ५० गुणांची होती. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी आणि इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी या दोन गटांसाठी घेण्यात आली. त्यात अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी गटात एकूण १५ संघ आणि इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी गटात एकूण १६ संघ असे दोन गटात मिळून ३१ संघ सहभागी झाले होते.