Breaking

शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर मिळालेली शासकीय आर्थिक मदत सायबर भामट्यांनी लुटली

Updated: ऑक्टोबर 2, 2025

By Vivek Sindhu

Cyber Crime

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शेतकरी विधवेसमोर अडचणींचा डोंगर; लाडक्या बहिणीचेही पैसे झाले गायब 

बीड : तालुक्यातील हिंगणी येथील शेतकरी विधवा महिलेच्या नावावरील पोस्ट पेमेंट बँक खात्यातील तब्बल १ लाख ३३ हजार ९९५ रुपये अज्ञात सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी मिनाक्षी दत्ता आंधळे (वय ४०) यांनी बीड सायबर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे.

मिनाक्षी आंधळे या दोन मुलांसह राहत असून मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. त्यांच्या पतीने मागील वर्षी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेला मदतनिधी व शासनाच्या ‘लाडकी बहीण योजना’अंतर्गत मिळणारे मानधन तसेच मजुरीची रक्कम चौसाळा येथील पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असे.

मात्र, सप्टेंबर महिन्यात त्यांच्या मोबाईलचे सिमकार्ड अचानक बंद पडल्याने त्या काळात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नावावरचे सिमकार्ड सक्रिय करून बँक खात्यातील रक्कम परस्पर हस्तांतरित केली. ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर या झालेल्या सात व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून एकूण १ लाख ३३ हजार ९९५ रुपये काढून घेण्यात आले.

दरम्यान, शेतामध्ये खत पेरणीसाठी पैसे काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या असता खात्यामध्ये रक्कम नसल्याचे त्यांना समजले. तुमच्या सोबत ऑनलॉईन फसवणुक झाली असून रक्कम विविध ठिकाणी गेली असल्याचे बँकेतून त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी नेकनूर पोलीस ठाणे गाठून प्राथमिक तक्रार दिली. या प्रकरणात मिनाक्षी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीडच्या सायबर ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर कसेबसे स्वतःला सावरून मुलांचा सांभाळ करणाऱ्या शेतकरी महिलेसमोर या घटनेनंतर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.


Categories

Recent Posts