गेवराई : तालुक्यातील देवपिंपरी बसस्थानकाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास घडली. फिर्यादी अविनाश रामभाऊ शेडगे (वय २५, रा. पवळाची वाडी, ता. गेवराई) हा नेहमीप्रमाणे त्याचे कॉफी शॉप बंद करून घरी जात असताना देवपिंपरी बसस्थानकाजवळ थांबला. यावेळी आरोपी अक्षय नरवडे (रा. देवपिंपरी, ता. गेवराई) व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम आले. जुने भांडण काढून फिर्यादीस शिवीगाळ करत “तु लय माजलास का” असे म्हणत आरोपींनी संगनमत करून त्याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात आरोपींनी लाकडी दांड्याने अविनाशच्या डोक्याला व पायाला मारून गंभीर जखमी केले. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ अभिषेक शेडगे भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालाही आरोपींनी लाथाबुक्क्याने व दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत अविनाश शेडगे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह आघाव हे करीत आहेत.