Breaking
Updated: ऑगस्ट 13, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील भगवान बाबा चौकात दोघा जणांनी ड्रायव्हर तरुणाला विनाकारण बेदम मारहाण करून त्याच्या कानाचा पडदा फाडल्याची आणि वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या बहिणीलाही मारझोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हनुमंत विष्णू सादुळे (वय 28, रा. पुस, ता. अंबाजोगाई, ह.मु. आदर्श कॉलनी, अंबाजोगाई) हे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भगवान बाबा चौकाजवळील पान टपरीवर गेले होते. यावेळी संदेश सुरेश कराड आणि आशिष चव्हाण (दोघेही रा. माळीनगर) हे दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी हनुमंत यास विनाकारण टपरीवरून बाहेर खेचून शिवीगाळ करत लाथाबुक्क्या आणि चापटांनी मारहाण केली. यावेळी संदेश कराड याने डाव्या कानावर जोरात चापट मारल्याने हनुमंतच्या कानाचा पडदा फाटून रक्तस्त्राव झाला, तर आशिष चव्हाण याने गळा दाबून व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे चेहऱ्यावर आणि गळ्यावर ओरखडे पडले.
मारहाणीची माहिती देण्यासाठी सादुळे यांनी बहिण सुनिता दादासाहेब सावंत हिला फोन केला. काही वेळातच सुनिता सावंत आणि मोठा भाऊ दत्ता सादुळे घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपींनी पुन्हा हनुमंतवर हल्ला केल. यावेळी वाद सोडवण्यास गेलेल्या बहिणीवरही त्यांनी हल्ला केला. या मारहाणीत तिच्या डाव्या हातातील बांगड्या फुटून काचा लागल्याने ती जखमी झाली.
जखमी अवस्थेत हनुमंत सादुळे यांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले असता कानाचा पडदा फाटल्याचे निष्पन्न झाले. जखमी हनुमंत सादुळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदेश सुरेश कराड आणि आशिष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. पुढील तपास पोलीस हवालदार भागवत करत आहेत.