Breaking
Updated: ऑगस्ट 13, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : न्यायालय व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार यावर्षी गणेशोत्सवात शंभर टक्के डीजे बंदी राहणार असून, याबाबत कोणालाही सूट देणार नाही. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मिरवणुकांदरम्यान कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा गोंधळ सहन केला जाणार नाही. सर्व गणेश मंडळांनी शिस्त पाळून उत्सव साजरा करावा, अन्यथा पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल असा स्पष्ट इशारा सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी दिला आहे. अंबाजोगाई शहरात गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी अंबाजोगाई पोलिसांच्या वतीने नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात आयोजित केलेल्या शांतता बैठकीत ते बोलत होते.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, वीजपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, विसर्जन मार्ग, ध्वनीप्रदूषण नियंत्रण यांसह अनेक विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी कायद्याचे पालन करण्याचे व पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, विसर्जन मिरवणुका वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी त्या लवकर सुरू करणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी विसर्जन मार्गाचा पूर्व सर्व्हे करून अडथळे दूर करावेत, वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत. अंबाजोगाईने आजवर शांततेत गणेशोत्सव साजरा केल्याचे त्यांनी नमूद करत, गणेश मंडळांनी सामाजिक सलोखा जपणारे, सामाजिक संदेश देणारे व जनजागृती करणारे देखावे तयार करावेत, असे आवाहन केले.
तहसीलदार विलास तरंगे यांनी यावर्षी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गणेशोत्सव स्पर्धांची माहिती देत त्यांनी, गणेश मंडळांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन विसर्जनाचा कालावधी कमी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. महावितरणचे उपअभियंता कानडे यांनी वीजपुरवठ्याबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल असे सांगितले. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा, मिरवणुकांसाठी अपुरा वेळ आणि अपुरा पोलीस बंदोबस्त या समस्या अनेक गणेश मंडळ प्रमुखांनी बैठकीत मांडल्या. यावर संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीस नायब तहसीलदार देशपांडे, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक इफ्तिकार शेख, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, तसेच शहरातील सर्व गणेश मंडळ प्रमुख, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने सर्व मंडळांना सहकार्याची ग्वाही देत, नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
डीजे बंदीचे नागरीकातून स्वागत
दरम्यान, पोलिसांनी डीजे बंदीची कडक अंमल बजावणी करण्याची भूमिका घेतल्याबद्दल नागरीकातून स्वागत होत आहे. डीजेच्या गोंगाटामुळे गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेला तिलांजली देण्यात येत होती अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली. तर, डीजे बुकिंगला आगाऊ रक्कम दिलेली असल्यामुळे कमी आवाजात डीजेची परवानगी देण्याची मागणी काही मंडळांनी केली. तसेच, या बंदीमुळे डीजे व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने ते देशोधडीला लागतील अशी खंत काही व्यावसायिकांनी बोलून दाखवली.