गेवराई : गेवराई पोलिस ठाणे हद्दीत 9 ऑगस्टला झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा धक्कादायक तपशील उघड झाला आहे. जखमी शितल भोसले हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात, सुरुवातीला दबावाखाली चुकीची माहिती दिल्याचे सांगत प्रत्यक्षात गोळीबार सवतीच्या भावानेच केल्याचे उघड केले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल भोसले (रा. शहागड, ता. अंबड) या 7 ऑगस्ट रोजी पती संदीप भोसले यांच्यासह खामगाव (ता. गेवराई) येथे आल्या होत्या. रक्षाबंधनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी दाम्पत्य राखी खरेदीसाठी गेवराईत गेले होते. खरेदी आटोपून परत जात असताना सवत रुचिका भोसले भेटली व दोघींमध्ये वाद झाला.
सायंकाळी सुमारे सात वाजता पांढरवाडी फाट्यावर वाद तीव्र झाला. सवत रुचिका हिचा भाऊ शावरी (साव-या) काळे, अतुल (गुड्डू) काळे, बहीण नाथा काळे आणि बंदु चव्हाण घटनास्थळी आले. त्यांनी शितलला “तु माहेरी जा, नाहीतर तुझ्यासह मुलालाही ठार मारू” अशी धमकी देत मारहाण केली. यामध्ये पती संदीप भोसले हाही सहभागी झाला.
दरम्यान, शावरी काळे याने गावठी बंदुकीतून शितलवर गोळी झाडली. गोळी लागून ती जखमी झाली. त्यानंतर पती संदीप आणि सवत रुचिका यांनी तिला दुचाकीवरून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी नंतर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन तिचा जबाब नोंदवला. त्यात शितलने स्पष्ट केले की, पती व सवतीच्या दबावामुळे आधी खरी माहिती लपवली होती.
या प्रकरणी पती संदीप ईश्वर भोसले, सवत रुचिका संदीप भोसले, शावरी काळे, अतुल नवनाथ काळे, नाथा नवनाथ काळे आणि बंदु भांड्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.