Breaking

सणासुदीला रेल्वेची ‘राउंड ट्रिप’ भेट; परतीच्या तिकिटावर २० टक्के सूट!

Updated: ऑगस्ट 9, 2025

By Vivek Sindhu

105440376

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नवी दिल्ली : सण-उत्सवांच्या काळातील गर्दी कमी करून प्रवाशांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेने नवी योजना जाहीर केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ची घोषणा करत सांगितले की, येण्या-जाण्याचे तिकीट एकाच वेळी बुक करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटाच्या मूळ भाड्यावर २० टक्के सूट मिळणार आहे.

ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असून, पहिल्या प्रवासाचे तिकीट १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानचे असावे लागेल. परतीचे तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’द्वारे आरक्षित करता येईल. दोन्ही तिकिटे एकाच प्रवाशाच्या नावावर, समान तपशीलांसह, एकाच क्लासची आणि एकाच स्टेशनपासून एकाच स्टेशनपर्यंतची असणे बंधनकारक आहे.

या योजनेत परतीच्या तिकिटासाठी ‘अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड’ लागू होणार नाही. मात्र, दोन्ही तिकिटे कन्फर्म असणे आवश्यक आहे. बुकिंगनंतर तिकीट बदल किंवा परतावा मिळणार नाही. परतीच्या तिकिटावर इतर कोणतीही सवलत, व्हाउचर किंवा पास लागू होणार नाही. ही सुविधा सर्व क्लास आणि बहुतेक गाड्यांसाठी लागू असून, ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या गाड्यांना ती मिळणार नाही.

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, या ऑफरमुळे सणांच्या काळातील प्रवासी गर्दी वेगवेगळ्या तारखांना विभागली जाईल आणि दोन्ही बाजूंनी गाड्यांचा योग्य उपयोग होईल. प्रवाशांना सहज तिकिटे मिळावीत यासाठी या योजनेचा प्रसार माध्यमे, रेल्वे स्टेशनवरील सूचना आणि इतर प्रचार माध्यमांतून व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे.


Categories

Recent Posts