Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनासाठी अंबाजोगाईचे ७६ ज्येष्ठ नागरिक रवाना होणार

Updated: फेब्रुवारी 14, 2026

By Vivek Sindhu

भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनासाठी अंबाजोगाईचे ७६ ज्येष्ठ नागरिक रवाना होणार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे ७६ सदस्य ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे आयोजित ‘अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाच्या’ (AISCCON) राष्ट्रीय अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत. २२ आणि २३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण अधिवेशनात देशभरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी होऊन आपल्या हक्क आणि कल्याणासाठी आवाज उठवणार आहेत. अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाने आपली परंपरा कायम राखत यंदाही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये ६० ते ८५ वयोगटातील स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. या प्रवासाचे नियोजन पूर्ण झाले असून ज्येष्ठांच्या या सहभागामुळे अंबाजोगाईच्या सामाजिक चळवळीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.
ज्येष्ठांना संघटित करून त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक आणि कौटुंबिक प्रश्न प्रभावीपणे सोडवणे तसेच त्यांच्या उर्वरित आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या राष्ट्रीय अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावर ‘फेस्कॉम’ (FESCOM) या संघटनेच्या अंतर्गत सात हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत असून तब्बल २० लाखांहून अधिक सदस्य या चळवळीशी जोडलेले आहेत. अंबाजोगाई येथील संघ १९८० पासून अधिकृतरीत्या नोंदणीकृत असून सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी मैसूर, उदयपूर, इंदूर, तिरुपती, गोवा, लखनऊ, मथुरा, दिल्ली आणि तिरुवनंतपुरम अशा विविध शहरांमध्ये पार पडलेल्या अधिवेशनांमध्येही अंबाजोगाई संघाने आपली विशेष छाप पाडली आहे.
यंदाच्या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंबाजोगाईच्या वतीने सादर केला जाणारा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होय. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २० ज्येष्ठ महिला आणि पुरुषांनी विशेष तयारी केली आहे. केवळ अधिवेशनापुरते मर्यादित न राहता, हे सर्व ज्येष्ठ नागरिक भुवनेश्वरसह जगन्नाथ पुरी, कोणार्क आणि परिसरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देऊन सहलीचा आनंदही लुटणार आहेत. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना संघाचे अध्यक्ष ॲड. अनंत जगतकर, सचिव शिवाजीराव शिंदे आणि सहल प्रमुख जगदीश जाजू यांनी सांगितले की, ज्येष्ठांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात उत्साह भरण्यासाठी अशा अधिवेशनांचे मोठे महत्त्व आहे.


Categories

Recent Posts