Breaking

पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस

15 जून नंतरच मोसमी पाऊस

कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘राज्यातील सर्व भागात पंधरा जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये.

पंधरा जून नंतरच पावसाची मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्यातील सतरा जिल्ह्यात पंचवीस टक्के पेक्षा कमी, बारा जिल्ह्यात पंचवीस ते पन्नास टक्के, चार जिल्ह्यांत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर एका जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

मोसमी पाऊस तीन चार दिवसांत सक्रिय
मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात बारा जून रोजी मराठवाड्यातील काही भागात बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर १३ ,१४ जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये.

वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, वीजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज पुरवठा खंडित करुन ठेवावीत, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

धरणातील पाणीसाठा समाधानकारक
राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली. धरणाचे नाव, सध्याचा पाणी साठा, गेल्या वर्षीचा साठा – गोसीखुर्द ४.६४ टीएमसी (८.६७), तोतलाडोह १८.७९ (१८.१४), ऊर्ध्व वर्धा ८.८५ (८.८७), जायकवाडी २२.६०(२.९९), मांजरा १.६३(०.००), ऊर्ध्व तापी हातनूर ५.३२(२.६३), गंगापूर २.५०(२.४८), कोयना १७.३६(१०.००), खडकवासला०.८४(१.०३), उजनी १८.७२(०.००), भातसा ९.९५(८.१७), धामणी ३.११(१.७७).

Last Updated: June 10, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा