Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

डोंगरदेवी दगडवाडी शिवारात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Updated: फेब्रुवारी 2, 2026

By Vivek Sindhu

डोंगरदेवी दगडवाडी शिवारात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. रायमोह येथील रहिवासी असलेल्या चांद ऊर्फ गुड्डू अलाउद्दीन तांबोळी या ३० वर्षीय तरुणाची अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत चांद तांबोळी हा व्यवसायाने रंगारी होता आणि कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असे. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दगडवाडी शिवारात स्थानिक नागरिकांना एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. मारेकऱ्यांनी चांदच्या डोक्यावर दगडाने इतके जोरात आणि वारंवार प्रहार केले होते की, त्याचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते. या हल्ल्यात चांदचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रायमोह येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हा खून जुन्या पूर्ववैमनस्यातून झाला की पैशांच्या व्यवहारातून, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. सध्या रायमोह परिसरात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलीस निरीक्षक विनोद घोळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts