नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्राद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. संविधानाच्या कलम ६७ (अ) अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला याचा हवाला दिला आहे.
धनखड यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले आहेत.
माहितीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात उपराष्ट्रपती धनखड यांना हृदयाशी संबंधित इन्फेक्शन झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती.
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, याच दिवशी उपराष्ट्रपती धनखड यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
राष्ट्रपतींना लिहिलेल्या आपल्या पत्रात धनखड म्हणतात, ‘‘आरोग्याला प्राधान्य देत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.’’
धनखड यांनी २०१४ मध्ये भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर आता नवीन नियुक्ती होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.