Breaking

व्हॉट्सअ‍ॅपवरील बनावट फाईलद्वारे मोबाईल हॅक

Updated: नोव्हेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

व्यापाऱ्याची ९७,५०० रुपयांची फसवणूक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

व्यापाऱ्याची ९७,५०० रुपयांची फसवणूक

अंबाजोगाई : व्हॉट्सअॅपवर आलेल्या एपीके फाईलवर क्लिक केल्याने मोबाईल हॅक होऊन खात्यातील ९७ हजार ५०० रुपये गमावल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईतील गुरुवार पेठ भागात समोर आली आहे. या प्रकरणात अनोळखी सायबर गुन्हेगारांविरुद्ध बीड सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. निलेश प्रकाश मुथा (रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई) यांनी तक्रार दिली आहे.
निलेश मुथा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांनी व्हॉट्सअॅप उघडले असता मित्र विनोद काबरा यांच्या मोबाईल क्रमांकावरून मिळालेली ‘Wedding Invitation Card.apk’ नावाची फाईल त्यांनी उघडली. फाईल ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. संध्याकाळी त्यांच्या सिमकार्डचे दुसऱ्या डिव्हाइसवर लॉगिन झाल्याचा संदेश आला आणि माय जिओ तसेच युपीआय अॅक्टिव्हेशनची सूचना मोबाईलवर मिळाली.
त्यानंतर रात्री ११ ते पहाटे १.३० या वेळेत बँक ऑफ बडोदा खात्यातून सलग १२ ट्रान्झॅक्शनद्वारे ९७,५०० रुपये वळते केल्याचे उघड झाले. मुथा यांनी तत्काळ बँक कॉल सेंटरशी संपर्क साधला तसेच १९३० सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन खाते तपासले असता फसवणूक झाल्याची खात्री पटली. या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर पोलीस बीड करीत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी .apk फाईल्स, लिंक व मेसेज उघडू नये, मोबाईलचा सिक्युरिटी बॅकअप ठेवावा आणि संशयास्पद सायबर हालचालींवर त्वरित १९३० वर कळवावे, असे आवाहन केले आहे.


Categories

Recent Posts