वर्षिक 7 हजार तरुणांना मिळणार औद्योगिक प्रशिक्षण
बीड – बीड जिल्ह्यातील तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या महत्वकांक्षी CIIIT प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार, MIDC च्या संचालक मंडळाने बीड औद्योगिक वसाहतीत फेज-3 मध्ये 4,000 चौ. मीटर जागा व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांनी गुरूवारी एका ट्विटच्या माध्यमातून बीड येथील सीआयआयआयटी प्रकल्पाला भूखंड वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीन मधील चार हजार चौरस मीटर जागा तसंच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळानं घेतला आहे.
या निर्णयामुळे बीड जिह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवणं, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. ‘एमआयडीसी’च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रासंदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या भारतात उद्योग 4.0 म्हणजेच डिजिटल, ऑटोमेशन, AI व आधुनिक तंत्रज्ञान यावर आधारित उत्पादन व सेवा क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी व उद्योगांच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी या प्रकारचे सेंटर अत्यंत आवश्यक मानले जात आहे. CIIIT मध्ये CNC मशीन ऑपरेशन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऑटोमेशन, IoT, डेटा अॅनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स यांसारख्या अद्ययावत कोर्सेसद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना स्थानिक व राष्ट्रीय उद्योगांमध्ये थेट नोकरीच्या संधी मिळतील. तसेच, काही कोर्सेस नंतर युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचीही क्षमता प्राप्त होईल.
प्रशिक्षणाचा खर्च पहिल्या 3 वर्षांसाठी टाटा टेक्नॉलॉजी उचलेल. त्यानंतर टाटा टेक्नॉलॉजी आणि जिल्हा प्रशासन प्रत्येकी 50% प्रमाणे खर्च उचलणार आहेत. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यात उद्योगासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होईल, स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळेल, आणि स्थलांतरित होणाऱ्या युवकांची संख्या कमी होईल. 2025 च्या एप्रिल महिन्यात बीड दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी या CIIIT प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि टाटा टेक्नॉलॉजीला सहकार्याचे आवाहन केले. कंपनीनेही सकारात्मक प्रतिसाद देत 191 कोटींच्या प्रकल्पाची तयारी दर्शवली.
दरम्यान, बीडमध्ये राबवला जाणारा हा प्रकल्प ही केवळ रोजगार निर्मिती नव्हे, तर जिल्ह्याच्या औद्योगिक भवितव्यासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे. विशेषतः बीडचे औद्योगिकीकरण व कौशल्य विकासासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.