Breaking

माजलगावात भरदिवसा धाडसी चोरी; कारमधील १ लाख रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबवली

Updated: मार्च 21, 2026

By Vivek Sindhu

माजलगावात भरदिवसा धाडसी चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत परभणी टी पॉइंटवरील मोरेश्वर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुमन खंडू झेटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमन झेटे (वय ६०), राहणार मोगरा, ता. माजलगाव, या २० मार्च २०२६ रोजी आपल्या पतीसह बँकेतून पैसे काढण्यासाठी माजलगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एसबीआय बँकेतील आपल्या खात्यातून ऊसाच्या बिलाचे १ लाख रुपये काढले आणि ते एका निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी ही पिशवी त्यांच्या स्वीफ्ट डिझायर कारच्या सीट कव्हरमध्ये सुरक्षितपणे ठेवली. मोगरा गावाकडे परत जात असताना दुपारी १.२० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली कार परभणी चौकातील मोरेश्वर हॉटेलसमोर थांबवली.

कारचा चालक बाथरुमसाठी गेला होता, तर सुमन झेटे यांचे पती आणि नातेवाईक चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. पतीनी चहासाठी बोलावल्याने सुमन झेटे देखील काही मिनिटांसाठी कारमधून खाली उतरून हॉटेलमध्ये गेल्या. अवघ्या दहा मिनिटांत सर्वजण चहा पिऊन परत आले असता, कारच्या सीट कव्हरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने कारमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून ही चोरी केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान बलवंटे करत आहेत. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Categories

Recent Posts