Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
तळ्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उलगडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकरंट लागल्याने मृत्यू, पुरावा लपवण्यासाठी तलावात फेकले प्रेत
वडवणी : पिंपळनेर येथील आशाबाई प्रल्हाद करांडे (वय 57) यांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ वडवणी पोलिसांनी उलगडले आहे. शेतातील करंटयुक्त तारेला चिकटून आशाबाई यांचा मृत्यू झाला होता, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह पाझर तलावात फेकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हनुमंत महादेव कांबिलकर आणि गणेश महादेव कांबिलकर (रा. खंडोबाची वाडी, ता. वडवणी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
घटनेचा तपशील असा की, दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी बालासाहेब यादव यांनी पोलीस ठाणे वडवणी येथे आपल्या सासू आशाबाई करांडे या सायंकाळी शेतातून घरी येताना हरवल्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती. या महिलेचा शोध सुरू असताना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी डोंगरवाडी (खडकी शिवार) येथील पाझर तलावात एका महिलेचे प्रेत मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना आढळले. पोलिसांनी प्रेत बाहेर काढून अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
प्रारंभी आत्महत्या, अपघात की खून असा तर्क लावला जात असतानाच, तपासाची दिशा ठरविणे वडवणी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, खंडोबाची वाडी शिवारातील काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी करंटयुक्त तारांचे कुंपण लावल्याचे आढळले.
तपास अधिक खोलात गेल्यावर संशयित हनुमंत आणि गणेश कांबिलकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विश्वासात घेतल्यावर त्यांनी कबुली दिली की, आशाबाई करंटच्या तारेला चिकटल्याने मृत्यू पावल्या, आणि प्रेत पाहून भीतीपोटी त्यांनी ते पाझर तलावात मोठा दगड बांधून टाकले. या प्रकरणात फिर्यादी सतिष प्रल्हाद करांडे (रा. पिंपळनेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे करत असून, आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.