Breaking
Updated: जानेवारी 28, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज, बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी जात असताना, बारामती विमानतळावर लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि विमान कर्मचारी अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला नियोजित सभांसाठी निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगसाठी येत असताना दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. पहिल्या प्रयत्नात यश न आल्याने वैमानिकाने ‘रनवे ११’ वर लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून घसरून कोसळले. विमानाने क्षणार्धात पेट घेतल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. विशेष म्हणजे, या दुर्घटनेपूर्वी वैमानिकाने कोणताही ‘मेडे’ (आणीबाणीचा) सिग्नल दिला नव्हता.

अपघाताच्या वेळी उपस्थित असलेल्या एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “विमान सुरुवातीला वरून गेले आणि त्यानंतर गावातून खालच्या बाजूने येताना दिसले. अचानक विमान हवेत फिरले आणि जमिनीला धडकताच मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की विमानाचे तुकडे आमच्या घरापर्यंत उडून आले.” अपघातानंतर विमानाचे इंजिन मुख्य भागापासून दूरवर फेकले गेले होते.

अजित पवार यांचे हे विमान ‘बोम्बार्डीयर’ कंपनीचे लिअरजेट ४५ (Learjet 45) या बनावटीचे होते. या प्रकारच्या विमानांचे जगभरात आतापर्यंत सहा अपघात झाले असून त्यातील चार अपघात जीवघेणे ठरले आहेत. तांत्रिक बिघाडांमुळे २००३ मध्ये या विमानांची उड्डाणे काही काळ स्थगित करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकरी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीमुळे मृतदेह बाहेर काढण्यात मोठे अडथळे आले. पोलिसांनी सर्व मृतदेह रुग्णवाहिकेने बारामती जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.