Breaking
Updated: फेब्रुवारी 4, 2026
भावकीच्या त्रासाला कंटाळून त्याने विहिरीत मारली उडी; दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: जमिनीच्या वादातून होणाऱ्या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका २२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोन नातेवाईकांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना मोहन शिंगणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा रामेश्वर मोहन शिंगणे याने लक्ष्मण बापुराव शिंगणे आणि मनिषा लक्ष्मण शिंगणे यांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले. फिर्यादीनुसार, अंबीकानगर परिसरातील गट क्रमांक १५६२ या जागेवरून गेल्या २० ते २५ वर्षांपासून भावकीमध्ये वाद सुरू आहे. या वादातून आरोपींनी वारंवार घरी येऊन शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने रामेश्वर प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यापूर्वी देखील त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी नातेवाईकांनी त्याला वाचवले होते.
३१ जानेवारी रोजी रात्री रामेश्वर अचानक बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने १ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तो बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबीकानगर परिसरातील एका विहिरीत रामेश्वरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.