Breaking

महादेव मुंडे हत्या प्रकरण : नार्को आणि ब्रेन मॅपिंग रिपोर्ट ‘SIT’च्या हाती

Updated: फेब्रुवारी 27, 2026

By Vivek Sindhu

हत्याकांडाचे सत्य लवकरच बाहेर येणार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हत्याकांडाचे सत्य लवकरच बाहेर येणार

बीड – परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली असून, एसआयटीच्या हाती नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा महत्त्वपूर्ण अहवाल लागला आहे. या अहवालातून हत्येमागील नेमके सत्य आणि गुपित बाहेर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, न्यायालयाच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच हा रिपोर्ट उघडला जाणार आहे. या अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या हत्याकांडाचा उलगडा कसा होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा जबाब अत्यंत निर्णायक ठरत आहे. बांगर यांनी ऑक्टोबर, जुलै आणि नोव्हेंबर अशा तीन वेगवेगळ्या महिन्यांत कॅमेऱ्यासमोर एसआयटीला आपले जबाब नोंदवले आहेत. या जबाबांमध्ये त्यांनी वाल्मीक कराडच्या मुलाच्या नावाचा वारंवार उल्लेख केल्याने आता तपासाची सुई थेट कराड कुटुंबाकडे वळली आहे. यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, हत्येचे धागेदोरे आता त्याच्या मुलापर्यंत पोहोचताना दिसत आहेत.

दुसरीकडे, एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत तपासाचा मोठा आवाका पूर्ण केला असून सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये 150 हून अधिक संशयित आणि 500 पेक्षा जास्त व्यक्तींच्या कॉल डिटेल्सची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाली का, या मुख्य पैलूवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच प्लॉटिंगचे व्यवहार आणि कौटुंबिक वाद अशा सर्वच बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत. या व्यापक तपासामुळे प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

20 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्या प्रकरणी त्यांचे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असून या घटनेत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांच्या दाव्यानुसार, केवळ 12 गुंठे जमिनीच्या वादातून वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलाने ही हत्या घडवून आणली असून, वाल्मीक कराडचा सहकारी बाळा बांगर याने यासंदर्भात अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. हत्येनंतर कराडने मुंडे यांचे कातडे, हाड आणि रक्त टेबलावर आणून ठेवले होते, असा खळबळजनक आरोप बांगर यांनी केल्याने या प्रकरणातील भीषणता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


Categories

Recent Posts