Breaking
Updated: जानेवारी 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: पत्नीचे अनैतिक संबंध आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ४४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. याप्रकरणी मयूर प्रताप पाटील देशमुख, पत्नी मनीषा आश्रुबा जाधव आणि सासू मंगल भारत खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवराज शिवाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ आश्रुबा शिवाजी जाधव हा सोलापूर जिल्ह्यात ऊसतोडणीचे काम करत होता. मात्र, त्याची पत्नी मनीषा हिचे मागील वर्षभरापासून मयूर पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते आणि त्यानेच मनीषाला वेगळी खोली करून दिली होती. या कारणावरून तिन्ही आरोपींनी आश्रुबाला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मयूर पाटील याने आश्रुबा यास जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुकी केली व हाकलून दिले होते. दुसऱ्या दिवशी २० जानेवारी रोजी सकाळी मनीषा आणि तिची आई मंगल खाडे यांनी घरात घुसून सामान नेले आणि आश्रुबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या सततच्या अपमानाला आणि छळाला कंटाळून आश्रुबाने २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला सरकारी दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील कचरू उनावणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.