Breaking
Updated: जानेवारी 30, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्नही आता अधांतरी सापडले आहे. विशेषतः गोरगरीब रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यासाठीचा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा बाराशे कोटी रुपयांचा ‘मास्टर प्लॅन’ आता पूर्णत्वास जाणार का, असा चिंतेचा सूर उमटत आहे. अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले होते, परंतु अजितदादांसारख्या निर्णयक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्वाच्या अकाली एक्झिटमुळे या सर्व प्रकल्पांना मोठा खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली नव्हती. बारामती प्रमाणेच बीडचा विकास करण्याचा त्यांचा मानस होता. रेल्वे, रस्ते, पाणी आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी त्यांनी स्वतंत्र आराखडा तयार केला होता. युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सीआयआयआयटी प्रकल्पाची घोषणा केली होती, तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विमानतळ उभारण्याबाबतही त्यांची चाचपणी सुरू होती. या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये स्वाराती रुग्णालयाचा पुनर्विकास हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.
स्वाराती रुग्णालयातील खाटांची संख्या ४५० वरून थेट ११५० पर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय अजित पवार यांनी घेतला होता. या प्रकल्पासाठी अंदाजे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण व तंत्रज्ञान विभागाचे सचिव एवढ्या मोठ्या खर्चासाठी तयार नव्हते. मात्र, अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या अजित पवार यांनी “मी पैसे देतोय ना, मग तुम्हाला काय अडचण आहे?” अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले होते. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच प्रशासकीय पातळीवर या मास्टर प्लॅनला गती मिळाली होती.
नागपूर येथील विजयगड येथे झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी या मास्टर प्लॅनचा सविस्तर आढावा घेऊन आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सचिव धीरज कुमार, केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा आणि अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आ. नमिता मुंदडा यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या सूचनांची दखल घेत या कामाला गती देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले होते.
अजित पवार यांच्या निधनामुळे आता या संपूर्ण प्रकल्पावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रशासकीय स्तरावर एवढ्या मोठ्या निधीची उपलब्धता आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अजित पवार यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज होती. आता हा मास्टर प्लॅन पुढे नेण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांना पुन्हा नव्याने मोठी कसरत करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील लाखो रुग्णांचे आरोग्य या प्रकल्पावर अवलंबून असल्याने, राज्य शासन हा प्रकल्प त्याच वेगाने पूर्ण करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गोरगरीब रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार देण्याचे अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.