Breaking

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाचे पडसाद बीडमध्ये

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

परळीत अमेरिका आणि इस्रायलच्या ध्वजाची होळी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळीत अमेरिका आणि इस्रायलच्या ध्वजाची होळी

परळी: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात उमटले असून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनामुळे परळीतील इराणी समाज आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी परळी शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला असून संतप्त आंदोलकांनी अमेरिका आणि इस्रायलचे राष्ट्रध्वज जाळून आपला तीव्र संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा सोमवारी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेचे तीव्र पडसाद परळी शहरात उमटले असून स्थानिक इराणी वस्तीपासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अबालवृद्धांसह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता आणि आंदोलकांनी यावेळी अमेरिका अन् इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

मोर्चात सहभागी झालेल्या इराणी बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अयातुल्ला अली खामेनी यांची शहादत पवित्र रमजान महिन्यात झाली आहे. अयातुल्ला ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक विचारधारा आहे आणि विचारधारा कधीही मरत नसते असे मत यावेळी आंदोलकांनी मांडले. त्यांचे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून ही लढाई लढत असून हा लढा यापुढेही सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अयातुल्ला खामेनी हेच या भीषण युद्धाला थांबवू शकले असते असा दावाही यावेळी समाजबांधवांनी केला आहे.


Categories

Recent Posts