Breaking
Updated: जानेवारी 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने मुकादम विष्णू पांडुरंग यादव यांच्यावर दाखल केलेला २ लाख ३८ हजार ४७८ रुपयांचा धनादेश अनादर खटला फेटाळून लावला आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्ष कायदेशीर देणी सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लालासाहेब विश्वनाथ इंगळे यांनी विष्णू पांडुरंग यादव यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. कारखान्याच्या दाव्यानुसार, विष्णू पांडुरंग यादव यांनी २०११-१२ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोड आणि वाहतुकीचा करार १ जुलै २०११ रोजी केला होता. या कामासाठी कारखान्याने यादव यांना वेळोवेळी एकूण ६ लाख १० हजार ९७० रुपये उचल म्हणून दिले होते. यादव यांनी ४ लाख २९ हजार ६१८ रुपयांचे काम करून काही रक्कमेची परतफेड केली, मात्र उर्वरित १ लाख ८१ हजार ६१८ रुपये आणि त्यावरील व्याज असे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ४७८ रुपये त्यांच्याकडे बाकी होते.
ही थकीत रक्कम देण्यासाठी विष्णू पांडुरंग यादव यांनी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा धनादेश दिला होता. कारखान्याने हा धनादेश बँकेत वटवण्यासाठी भरला असता, यादव यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे तो १ मार्च २०१८ रोजी न वटता परत आला. यानंतर कारखान्याने कायदेशीर नोटीस बजावूनही रक्कमेचा भरणा न झाल्यामुळे कारखान्याने न्यायालयात खटला दाखल केला होता.
विष्णू पांडुरंग यादव यांनी न्यायालयात बचावात्मक पवित्रा घेताना कारखान्याचे सर्व दावे फेटाळून लावले. करार करताना कारखान्याने सही करून घेतलेल्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करून ही खोटी केस दाखल केल्याचा दावा यादव यांनी केला. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बँकेचे शाखाधिकारी राजेंद्र नागनाथ कांबळे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांच्या पुराव्यानुसार कारखान्याने दावा केल्याप्रमाणे २८ जुलै २०११ रोजीची १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम यादव यांच्या खात्यात जमा झाल्याचे बँक रेकॉर्डवरून दिसून आले नाही.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चौहान यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांचे अवलोकन केले. कारखान्याने थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी २०१२ पासून २०१८ पर्यंत कोणतीही कायदेशीर पाऊले का उचलली नाहीत, याचे समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. तसेच व्याजाची रक्कम कोणत्या आधारावर निश्चित केली, हे देखील सिद्ध होऊ शकले नाही. न्यायालयाने १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल देताना विष्णू पांडुरंग यादव यांची परक्राम्य लेख अधिनियमाच्या कलम १३८ अन्वये गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे वकील एन. पी. केदार यांनी काम पाहिले आणि प्रभावी युक्तिवाद करत न्याय मिळवून दिला.