केज – केज या तालुक्याच्या ठिकाणी राहून कारभार करणाऱ्या तलाठ्यांना त्यांच्या सज्जावर पाठवावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केज तालुक्यातील अनेक तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसून तालुक्याच्या ठिकाणी बसून कारभार करीत आहेत. शासनाने बांधून दिलेले सज्जावरील तलाठी कार्यालय धूळखात पडला असून काही ठिकाणी तलाठी कार्यालयाचा जुगार खेळण्यासाठी वापर केला जात आहे. तर तलाठी कार्यालय जनावरांचे गोटे बनले आहेत.
जनतेच्या सोयीसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालयाच्या इमारती उभ्या केल्या. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून पीक विमा, अनुदानसह इतर अनेक योजनेसाठी तलाठ्यांच्या कागदपत्राची गरज पडत असून शेतकरी, लाभार्थ्यांना तलाठ्यांना शहरात शोधत फिरावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून आणि येण्या – जाण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याची दखल घेऊन येत्या आठ दिवसात तलाठ्यांना आपापल्या सज्जावर उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा तालुका प्रमुख अशोक जाधव, उपजिल्हा प्रमुख दीपक मोराळे, युवासेना तालुका प्रमुख किशोर घुले, शहर प्रमुख तात्या रोडे, तालुका सचिव सखाराम वायबसे, जिल्हा संघटक दिलीप जाधव, उपशहर प्रमुख पप्पू ढगे, अशोक कोल्हे, महादेव घोळवे, प्रभाकर शिंदे, नारायण तांदळे यांच्यासह शिवसैनिकांनी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.