Breaking
Updated: July 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupसंविधानविरोधी विधेयक रद्द करण्याची जोरदार मागणी
अंबाजोगाई – राज्यातील जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी अंबाजोगाईतील विधिज्ञ आणि वकिलांनी एकत्र येत जोरदार आवाज उठवला. संविधानाच्या विरोधात जाणारे व लोकशाहीला धोका निर्माण करणारे हे विधेयक असून यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे, असा ठाम सूर यावेळी उपस्थित वकिलांनी व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देत या कायद्याला तीव्र विरोध करण्यात आला.
या वेळी विधिज्ञांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली समाजातील कष्टकरी, वंचित, शोषित तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पत्रकार, मानवी हक्क रक्षक यांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकार स्वतः म्हणते की राज्यातील नक्षलवाद आणि दहशतवाद संपला आहे, मग अशा परिस्थितीत हा कायदा नेमका कोणासाठी? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
यावेळी विधिज्ञांनी नमूद केले की, या कायद्यात सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले असून त्यामार्फत कोणत्याही शाब्दिक किंवा कृतीद्वारे प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, या तरतुदीचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय विरोधक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना लक्ष्य करण्यासाठी गैरवापर होण्याचा धोका आहे. त्यामुळे जनसुरक्षेच्या नावाखाली नागरिकांच्या हक्कांचे गळचेपी करणारे हे विधेयक तात्काळ रद्द करावे, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना अंबाजोगाईतील मोठ्या संख्येने विधिज्ञ, वकिल मंडळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संविधान रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धारही व्यक्त केला.