Home »
Latest News » उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून खासगी रक्त तपासणी लॅबचे दर निश्चित करून रूग्णांची आर्थिक फसवणूक थांबवा
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून खासगी रक्त तपासणी लॅबचे दर निश्चित करून रूग्णांची आर्थिक फसवणूक थांबवा
Updated: फेब्रुवारी 27, 2026
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील काही रक्त तपासणी लॅब चालक रक्त तपासणी करीता अवाढव्य शुल्क आकारत आहेत असे निदर्शनास आले. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून खासगी रक्त तपासणी लॅबचे दर निश्चित करा व रूग्णांची आर्थिक फसवणूक थांबवा अशी मागणी रिपाइं (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी गुरूवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात अक्षय युवराज भुंबे (मराठवाडा विभागीय अध्यक्ष, रिपाइं (खरात गट) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, त्यांच्या पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल मिलिंद तरकसे हे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ५ वाजेच्या दरम्यान स्वराती ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई येथे वार्ड क्रमांक १२ मध्ये आपल्या जवळच्या महिला रूग्णाला तपासणी करीता घेऊन गेले होते. त्यावेळी सदरील महिला रूग्णाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत डॉक्टरांनी महिला रूग्णाचे रक्त तपासणी करावी लागेल, यासाठी कोणती टेस्ट करायची त्याचा फॉर्म डॉक्टरांनी बादल तरकसे यांच्या हातात दिला. त्यानंतर लगेच तेथे कार्यरत कंपाऊंडरने एका खासगी लॅबच्या एंजंट बरोबर जाऊन रक्त तपासणी करून आणा म्हणून सांगितले, त्या खासगी लॅबच्या एजंटने बादल तरकसे यांना आपल्या टू व्हिलर ज्यूपिटर गाडीवरून एका खासगी लॅबकडे घेऊन गेला. त्या खासगी लॅब चालकाने बादल तरकसे यांना सररिल टेस्टसाठी १,४००/- रूपये लागतील असे सांगितल्यावरून तरकसे यांनी माझी तुम्ही फसवणूक करण्याकरीता मला इकडे घेऊन आलात का..? असे विचारल्यावर त्या खासगी लॅब चालकाने तुम्हाला जिथे करायची तिथे टेस्ट करा असे सांगितले. त्यानंतर बादल तरकसे हे ब्लड टेस्ट करण्याकरीता जात आसताना, त्या खासगी लॅबचा एजंट बादल तरकसे यांचा पाठलाग केला व तरकसे हे कोणाकडे ब्लड टेस्ट करतात हे पाहून सदरील लॅबच्या चालकाला लगेच फोन करून सांगितले की, आम्ही त्याला १,४००/- रूपये सांगितले होते. तुम्ही १,८००/- रूपये सांगा. परंतु, त्या दुसऱ्या खासगी लॅब चालकाने मात्र सदरिल टेस्ट ही १,०००/- रूपयांमध्ये करून दिली. त्यामुळे पुर्वीच्या खासगी लॅबच्या एजंट याने तरकसे यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यावरून असे दिसून येते की, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या असाहयतेचा गैरफायदा घेऊन स्वाराती रूग्णालयात खासगी रक्त तपासणी लॅबच्या एजंटांना हाताशी धरून कोणते रॅकेट तर चालवले जात नाही ना याची शंका उपस्थित होत आहे. अशा एजंटांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भाच्या ग्रामीण भागातून आलेले रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक सुरू आहे. सदर घटना ही गंभीर असून याची सखोल चौकशी करावी, सदरील घटनेचे सी.सी.टीव्ही फुटेज तपासून तसेच संबंधित दोन्ही खाजगी लॅबच्या एजंट व चालकाचे झालेले संभाषण तपासून गुन्हा दाखल करावा. तसेच अंबाजोगाई शहरात काही लॅब चालक हे रूग्णांकडून भरमसाठ व आवाजावी दर आकारून त्यांची पिळवणूक करीत असल्यामुळे उच्चस्तरिय समिती नेमून विविध रक्त तपासणीसाठीची दर आकारणी निश्चित करावी, शहरातील सर्व खासगी रक्त तपासणी लॅबच्या बाहेर रितसर दरफलक लावून अंमलबजावणी करावी. अन्यथा या प्रश्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाच्या वतीने स्वाराती शासकिय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा रिपाइं (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे, विभागीय महासचिव अरूण बनसोडे, जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बादल तरकसे, गणेश उपाडे, शंकर उजगरे आदींनी दिला आहे.
सोबत – बातमीचा फोटो.