Breaking

श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्त मंडळाने केला पारदर्शक कारभार

Updated: सप्टेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्त मंडळाने केला पारदर्शक कारभार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

भाविक-भक्तांना सुविधा ; मंदिर परिसर विकास आणि जिर्णोद्धारासाठी प्रयत्न सुरू केले होते – पत्रकार परिषदेतून माजी विश्वस्तांची माहिती

अंबाजोगाई – येथील श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्त मंडळाने अल्पावधीतच पारदर्शक कारभारातून भाविक-भक्तांचा विश्वास संपादन केला होता. विविध उपक्रम राबवून भाविक-भक्तांची मने जिंकली होती. भाविक-भक्तांना सुविधा, मंदिर परिसर विकास आणि जिर्णोद्धारासाठी प्रयत्न ही सुरू केले होते. पण, ज्या विश्वस्तांवर लेखापरीक्षक, तहसीलदार व आयकर विभाग यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. त्यांनाच पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून नेमण्यात आले आहे. हे चुकीचे आहे. व ज्यांनी चांगले काम केले त्यांना मात्र वगळण्यात आले. हे धक्कादायक आहे. या आश्चर्यकारक बदलांमागे सर्वोच्च राजकीय दबाव व प्रचंड आर्थिक व्यवहार करून. नविन विश्वस्त मंडळ नेमले आहे. अशी श्री.योगेश्वरी देवीच्या भाविक- भक्तांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती माजी विश्वस्तांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या माजी विश्वस्तांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले की, मा.धर्मादाय आयुक्त, लातूर यांच्या अदेशानुसार २०२४ साली मा.धर्मादाय आयुक्त, बीड यांनी शासनाच्या सर्व नियम व अटींच्या अधिन राहून दिनांक ०१/०७/२०२४ रोजी श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या नविन विश्वस्त मंडळाची निवड केली, सर्व नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची दिनांक ०१/०७/२०२४ रोजी देवल कमिटीचे पदसिध्द अध्यक्ष तहसिलदार विलास तरंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत अंबाजोगाई शहराचे आराध्य, ग्रामदैवत माता श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या उपाध्यक्षपदी अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तर सचिवपदी प्रा.अशोकराव लोमटे, सहसचिवपदी संजय भोसले तसेच कोषाध्यक्षपदी शिरीष पांडे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आल्याचे कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे यांनी त्यावेळी जाहीर केले होते. निवडी जाहीर केल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मी आई श्री योगेश्वरी जगदंबेची शपथ घेतो की, आम्ही श्री योगेश्वरी देवी मंदिर विश्वस्त न्यासाचा व देवी भक्तांच्या हिताचेच निर्णय घेऊ, सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवू, त्याचबरोबर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आग्रही व प्रयत्नशील राहू अशी शपथ घेतली. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाची पहिली बैठक होऊन त्या बैठकीत दिनांक १८/०७/२०२४ पासून मातेच्या महाआरतीनंतर दुपारी १२ ते दुपारी २ या वेळेत (अन्नछत्र) महाप्रसाद सुरू करण्याचा ऐतिहासिक असा पहिला ठराव घेण्यात आला. सदरील महाप्रसाद त्या दिवसापासून ते आजतागायत दररोज सुरू असून अंदाजे ५०० ते ६०० भक्त याचा लाभ घेतात. दुसऱ्या ठरावात मंदीराचे दैनंदिन व्यवस्थापन चांगल्या रितीने चालविण्यासाठी मंदीराचे उत्पन्न वाढविण्यासाठी सकाळी पैठणीसह देवीची प्रथम महापुजा करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. यामध्ये प्रथम महापुजेस येणाऱ्या दोन व्यक्तीस रू.१०००/- ची अभिषेक करण्याची पावती घेवूनच प्रथम महापुजा करता येईल. यामध्ये पैठणी (आवश्यक) यामुळे मंदीराचे मासिक उत्पन्न रू.६२,०००/- इतके वाढले. मंदीरात होणारे देवीचे अभिषेक हे देवल कमेटीस कळवून व रितसर पावती घेवूनच करावे असा ठराव ही घेण्यात आला. मंदीरात या अगोदर होणाऱ्या अभिषेक किंवा पुजेची नोंद अल्प प्रमाणात होत होती. हा ठराव मंदीरात पुजा विधी करणाऱ्या ब्राम्हणवृंदांनी देखील मोठ्या मनाने मान्य केला. यामुळे देखील मंदीराच्या मासिक उत्पन्नात रू.१५,०००/- ते २०,०००/- एवढी वाढ झाली. तसेच सर्व ब्रम्हवृंदांना अभिषेक वाटून दिले. यापुर्वी एकाच ब्राम्हण बांधवाकडून अभिषेक करून घेतले जात होते. दररोज रू.५०/- प्रति अभिषेक याप्रमाणे २५ ते ३० अभिषेक दैनंदिन होत असतात. आज मितीस देवस्थानास जवळपास नगदी रोख बँक खात्यात जमा शिल्लक, सोने-चांदीसह अंदाजे रू.१ कोटी रूपये उत्पन्न जमा आहे. यापूर्वी सकाळच्या प्रसादात दररोज फक्त खिचडी/शिरा वाटप होत होते. मात्र आमच्या विश्वस्त मंडळाने महाप्रसाद, अन्नछत्र सुरू केल्यामुळे दर्शनासाठी बाहेर गावांवरून येणाऱ्या भाविक व गावातील भक्तांची सोय झाली आहे. मागील अंदाजे १० ते १२ वर्षांपासून सौरऊर्जा प्रकल्प नादुरूस्त अवस्थेत पडला होता. तो दुरूस्तीसाठी ठराव घेऊन रीतसर नियमाप्रमाणे कोटेशन मागवून घेवून तो दुरूस्त करून घेण्यात आला. त्यामुळे त्याच रक्कमे मध्ये बंद पडलेल्या सोलार सिस्टीमची दुरूस्ती करून घेतली. ज्यामुळे मंदीराचे एमएसईबीचे वीज बील शुन्यापर्यंत आणण्यात आमच्या विश्वस्त मंडळाला यश आलेले होते. यामुळे मंदीराच्या मासिक खर्चात रू.२५ ते ३० हजार रूपयांची बचत होऊन तेवढ्या रकमेचे मंदिराचे उत्पन्न वाढणार आहे. आम्ही मंदीराच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष देऊन मंदीराचा कोपरा न कोपरा दररोज स्वच्छ कसा राहील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामुळे आज मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेला भाविक मंदीरात थोडा वेळ शांत बसून आत्मिक शांततेचा व समाधानाचा अनुभव घेत आहे. दर दोन तासाला मंदीर परिसर स्वच्छ केला जात असल्याने मंदीराचे पावित्र्य अबाधित राहत आहे. यामुळे ही मंदिराचे उत्पन्न वाढीस हातभार लागला आहे. पारदर्शक कारभारासाठी आम्ही पुढाकार घेतल्यामुळे तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक सामुहिक राजीनामे दिले होते. कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे दिल्यामुळे काही काळ सुधारणेची घडी विस्कटली होती. पण, लवकरच आम्ही विश्वस्तांनी स्वतः लेखा विभाग, स्वच्छता आणि विविध कामांसाठी पुढाकार घेऊन शारदीय नवरात्र उत्सव व मार्गर्शिष उत्सव आनंदात व शांततेत साजरा केला. याचे आपण स्वतः सर्व पत्रकार मंडळी साक्षीदार आहोत. त्यानंतर आम्ही नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया नियमानुसार राबविली. शारदीय नवरात्र उत्सवात राज्य पातळीवरील नामांकित कलावंत यांना पाचारण करून उत्सवाला मोठे व व्यापक स्वरूप दिले. नवरात्र दर्शन पासच्या माध्यमातून मंदिराला ६ लाख रूपये प्राप्त झाले. यामुळे मंदिराचे उत्पन्न पुन्हा वाढले. मंदिर परिसरातील डीम लाईट काढून नविन फोकस बसविले. तसेच महाद्वार व शिखर परिसरात देवीची स्क्रीन बसवून भाविक भक्तांसाठी सेल्फी पॉईंट तयार केले. मार्गशिष महोत्सवात आराधी बसलेल्या महिला भक्तांना दररोज १० दिवस दोन वेळेस महाप्रसाद, उपावस खिचडी, नाष्टा, दोन वेळेस चहाची मोफत सोय देवल कमिटी तर्फे करण्यात आली. त्यामुळे भक्तगणांत आनंदाचे वातावरण होते. यावर्षी दर्शन लाईन सुद्धा शिस्तीत झाली. १० दिवस वेगवेगळ्या फुलांची आरास श्री योगेश्वरी देवीस करण्यात आली. श्री देवीच्या पालखीचे नवीन वस्त्र तयार करण्यात आले. वेगवेगळ्या भक्तांकडून आलेल्या चांगल्या, सकारात्मक सुचनांची अंमलबजावणी वेळोवेळी करण्यात आली. व या पुढेही करण्याचा आमचा प्रयत्न होता. आताच्या विश्वस्तांनी सन २०१४ पासून योगेश्वरी देवल कमिटीचे लेखापरिक्षणच केलेले नव्हते. सन २०१४ मध्येच शेवटचे लेखापरिक्षण झाले होते. सदरील लेखापरिक्षणामध्ये लेखापरीक्षकांनी अनेक गंभीर दोष दाखविलेले आहेत. सदरील लेखापरिक्षण दुरूस्ती करण्यासाठी आम्ही विश्वस्तांनी तत्कालीन सर्व कर्मचाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला. आम्हाला सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तगादा लावला. त्यामुळेच सर्व कर्मचाऱ्यांनी एकदम राजीनामा दिला होता याचे गौडबंगाल अद्याप उलगडले नाही. तसेच आमच्या पुर्वीच्या सचिव, कोषाध्यक्ष यांनी आम्ही कार्यरत असेपर्यंत आम्ही वारंवार मागणीकरून ही आम्हाला कोणतेही रेकॉर्ड, तपशील, कागदपत्रे, लॉकरच्या चाव्यांची माहिती ही दिलेली नव्हती, त्यांनी आम्हाला संपूर्ण चार्जही दिला नाही. तरी देखील पारदर्शक कारभार व भाविक-भक्तांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच मंदिर परिसर विकास आणि जिर्णोद्धारासाठी आमच्या विश्वस्त मंडळाने सदरील लेखापरिक्षणासाठी वेळ देवून ऑडिट करून घेत होते. आमच्या विश्वस्त मंडळाने अल्प कालावधीत सन २०१९-२० पर्यंतचे ऑडिटचे काम पूर्ण केले आहे. सदरच्या ऑडिट करीता लेखापरीक्षक म्हणून व्ही.बी.वालवडकर ऍण्ड कंपनी यांना नियुक्त केले होते. दोष दूर करून पुढील सर्व वर्षांचे लेखापरिक्षण लवकरच पुर्ण करून घेण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न होता. आयकर विभागाकडून अचानक आलेल्या नोटिसीमुळे व्यवहार सीज करण्याचे आदेश आले. सन २०१९-२०चा आयकर १ कोटी ४१ लाख असून सन २०२०-२१ चा आयकर ९६ लाख आलेला आहे. याच्या २० टक्के रक्कम २०१९-२० सालची २७ लक्ष १ हजार ५००/- व २०२०-२१ सालची २० टक्के रक्कम १९ लक्ष ३५ हजार एकुण ४६ लक्ष ३६ हजार ५०० रू/- आयकर दंड भरणा केलेला आहे. सदरील दंड मागील कमेटीने फक्त आयकर विवरण न भरल्यामुळे व आलेल्या आयकर नोटीस गांर्भियाने न घेतल्यामुळे झाला आहे. ०१/०७/२०२४ रोजी पासून ते आम्ही कार्यरत असेपर्यंत साधारण दहा महिन्यांत सर्व खर्च वजा जाता आणि आयकर विभागाचा सर्व दंड भरून तसेच सर्व अन्नदानाचा, कर्मचारी वेतनाचा खर्च वजा जाता श्री योगेश्वरी देवी समोरील व गाभाऱ्यातील सर्व उत्पन्न पुजारी यांना जात असताना या कमिटीने तत्कालीन नऊ महिन्यांत एक कोटी रूपये जमा केलेले आहेत. या १ कोटी रूपयांच्या ठेवीचे फिक्स डिपॉझीट केलेले आहे. सदरील रक्कम ही मुख्य शिखर जिर्णोद्धारसाठी वापरण्याचा आमच्या विश्वस्त मंडळाचा मानस होता. यात्री निवास, पार्किंग निविदा काढून मंदिराच्या उत्पन्नात वाढ केली आहे. यापूर्वी यात्री निवासातून २ लाख ६० हजार रूपये एवढे वार्षिक भाडे मिळत होते. तर निविदा काढण्यात आल्यामुळे ते १७ लाख रूपये वार्षिक या प्रमाणे गेले. तर पार्किंग १ लाख २० हजार रूपयांऐवजी ३ लाख रूपयांना गेले. मार्गशीर्ष महोत्सवात राज्यस्तरीय कलावंतांना निमंत्रित करून अन्नछत्र, स्वच्छतेसाठी ५० महिलांची नेमणूक केली. २०० टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विविध संगीत क्षेत्रातील मान्यवर बोलावून त्यांचे कार्यक्रम भक्तांसाठी आयोजीत केले होते आणि आराध बसायला सतरंजीची व्यवस्था ही करण्यात आली होती. मागील २० वर्षांपासून ठेवी (फिक्स डिपॉझिट) पावत्या रिन्युअल केल्या नाहीत म्हणून त्याचा हिशोब उपलब्ध नव्हता. त्यामुळे सदर रक्कम ही रिझर्व्ह बँकेत जमा आहे. ती रक्कम परत मंदिरास मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल होतोत. सदरील रक्कम अंदाचे १ कोटींच्या असपास आहे. दुकान व व्यापारी गाळे यांची भाडे वसुली नाही. कित्येक दुकानदाराकडे तर पाच वर्षांपासुनचे भाडे थकीत आहे. पुजाऱ्याला वेगवेगळ्या नांवाने दुकाने दिली आहेत. २००३ पासून नियमित भाडे वाढ करावी असे असताना ही नियमित भाठे वाढ केली नाही. त्याचे करारपत्र ही नाहीत. संबंधित ट्रस्टला आयकर विभागाचा दंड भरावा लागल्यामुळे तहसीलदार साहेब यांनी आमच्या पुर्वीच्या ट्रस्टींच्या अव्यवस्थित कारभाराबाबत माजी सचिव व पदाधिकारी यांना यापूर्वी २ वेळा कारणे दाखवा व वैयक्तिक कायदेशिर कार्यवाहीची नोटीस बजावली आहे. आमच्या पुर्वीच्या कमेटीवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही नवीन आर्थिक वर्षांत सर्व कार्यालयीन कारभार हा संगणकीकृत करण्यात आलेला आहे. देणगीदार, भाविक, भक्त तसेच इतर ही बाबींसाठी आवश्यक सर्व पावत्या संगणकीकृत देण्यात येत आहेत. आमच्यापुर्वी सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांमध्ये जे विश्वस्त मंडळ कार्यरत होते त्यांच्या वेळेस जेव्हा दानपेट्या उघडण्यात आल्या त्यावेळेस दानपेटीत ७ लाख ८९ हजार ७५१ रूपये असल्याचे आढळून आले. तर आम्ही कार्यरत असताना दानपेटीत ३७ लाख ७६ हजार ३४४ रूपये निघाले. आमच्यापुर्वी सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांमध्ये जे विश्वस्त मंडळ कार्यरत होते त्यांच्या वेळेस त्यांनी १ कोटी ५६ लाख ६८ हजार २७६ रूपये एवढे उत्पन्न दाखवले होते. तर आम्ही विश्वस्त म्हणून कार्यरत असताना २ कोटी ४७ लाख ५१ हजार ८४९ रूपये एवढे उत्पन्न दाखवले आहे. यावरून असे दिसून येते की, आम्ही विश्वस्त म्हणून कार्यरत असताना श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या उत्पन्नात वाढ केली आहे. असे असताना ही ज्या विश्वस्तांवर लेखापरीक्षक, तहसीलदार व आयकर विभाग यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. त्यांनाच पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून नेमण्यात आले आहे. हे चुकीचे आहे. व ज्यांनी चांगले काम केले त्यांना मात्र वगळण्यात आले. हे धक्कादायक आहे. या आश्चर्यकारक बदलामागे सर्वोच्च राजकीय दबाव व प्रचंड आर्थिक व्यवहार करून. नविन विश्वस्त मंडळ नेमले आहे. अशी श्री.योगेश्वरी देवीच्या भाविक भक्तांमध्ये चर्चा होत आहे. आजपर्यंत शासनस्तरावर मंदीराची नोंद कुठेच व कोणत्याच वर्गात करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आगामी काळात शासनाच्या तीर्थक्षेत्र तथा पर्यटन विभागाकडे (वर्ग-१) मंदिराची नोंद करून घेण्यासाठी आम्ही विश्वस्त मंडळी प्रयत्नशील होतोत. पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने २ कोटींचा निधी माजी आमदार पृथ्विराज साठे, देवल कमेटीचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, तहसिलदार विलास तरंगे साहेब यांनी पाठपुरावा व प्रयत्न करून मिळविला आहे. या निधीतून पालखी मार्ग, पार्कींग, गेट इत्यादी गोष्टी करण्याच्या मानस होता. यानंतर विकास आराखडा तयार करून एकुण अंदाजित १०० कोटींचा प्रकल्प राबविण्याचा मानस मंदिर प्रशासनाचा आहे. सदरील प्रकल्प आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार होतोत. सदरील कार्य मोठे आहे. पण, श्री योगेश्वरी देवीचे भाविक, भक्त आणि तमाम अंबाजोगाईकरांनी आमच्यावर वेळोवेळी जो विश्वास व्यक्त केला होता. त्या विश्वासाला आम्ही सर्व माजी विश्वस्त यापुढेही तडा जाऊ देणार नाही. अंबाजोगाई शहर हे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे व त्या माध्यमातून शहरातील व्यापार, रोजगार वाढावा यासाठी आमचे विश्वस्त मंडळ आगामी काळात ही प्रयत्नशील राहणार होते, तसेच आगामी काळात मंदीर विकास कामाचा पुढील ३० वर्षांसाठीचा रूपये १०० कोटींचा मास्टर प्लॅन आराखडा तयार करण्याचे काम वास्तू विशारद आकाश कऱ्हाड व अजय कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर) यांच्या सल्यानुसार सुरू होते, त्यासाठी आम्ही कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळाच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा ही करण्यात येत होता. हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो व त्या आदेशाचा मान राखतो. सदरील आदेशात २०२४ ला आलेल्या नविन कमिटी बाबत कोणतीही टीका टिप्पणी केलेली नाही. उलट ज्या मागील कमेटीने २०१६ ची घटना बनवली. ती घटना रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे २०१६ ला असलेल्या कमिटीवर त्याचा रोष जातो. सदरील २०१६ ची घटना ज्यांनी सादर केली. त्या घटनेत पुजाऱ्याचे हक्क डावलले गेलेले आहेत. पुजारी पण, २०१६ च्या घटने विरोधात कोर्टात गेलेले होते. त्यांचे हक्क संबंधी विचार व्हावा असे कोर्टाने आदेशित केलेले आहे. आम्ही सनदशीर मार्गाने मंदिराचा कार्यभार करत होतोत. याबाबत अनेक भक्तांनी आपले मत नोंदवलेले आहे. मागील ५० वर्षांपासून चालत असलेल्या कमिटीनेच २०२३ पर्यंत कामकाज केलेले होते. त्यांनीच २०१६ ची पण घटना तयार केलेली होती. त्या घटनेवरच कोर्टाने आक्षेप घेऊन सदरील घटना रद्द केलेली आहे. त्यामुळे २०२४ च्या कमेटीवर मा.न्यायालयाचा किंवा पुजाऱ्यांचा कोणताही अक्षेप नाही यांची सर्व भक्तांनी नोद घ्यावी. वेळोवेळी आपणा पत्रकार मंडळींना मुलाखत देत, आमच्या विश्वस्त मंडळाच्या अल्प कार्यकाळात मंदिरात होणाऱ्या व झालेल्या तत्कालीन नविन उपक्रमांची माहिती देवून ती जनतेपर्यंत पहोचविण्यात आपल्या सर्व पत्रकार मंडळींच्या सहकार्यामुळे आम्हाला शक्य झाले होते. त्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळाले. अशी माहिती श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे माजी सचिव प्रा.अशोकराव लोमटे, राजपाल भोसले, सतीशराव लोमटे, अमोल लोमटे, अजित चव्हाण, राजेभाऊ लोमटे, रवी कदम आणि श्रीमती संध्या मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.


Categories

Recent Posts