Breaking

गावठी पिस्टलसह सोमनवाडीचा धाबा चालक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Updated: एप्रिल 11, 2026

By Vivek Sindhu

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री एक महत्त्वपूर्ण कारवाई केली. सोमनवाडी शिवारातील एका धाबा चालकाकडे बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे पिस्टल जप्त केले असून आरोपीला पुढील तपासासाठी बर्दापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे सोमनवाडी शिवारातील धाबा चालक विलास अंकुश चाटे हा स्वतःकडे पिस्टल बाळगत असून तो सध्या धाब्यावरच हजर आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने धाब्यावर छापा टाकला. यावेळी करण्यात आलेल्या झडतीत विलास चाटे याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र मिळून आले. याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार गोविंद भताने, रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप यांच्यासह पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे आणि विकास राठोड यांनी सहभाग नोंदवला. आरोपी आणि जप्त केलेले मुद्देमाल बर्दापूर पोलिसांकडे सोपवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts