बीड : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल २ कोटी ५१ लाख ५१ हजार ६९२ रुपयांचा अपहार करणारा मुख्य आरोपी गोपाल बब्रुवान लोखंडे, रा. संजय नगर, कोर्टासमोर, गेवराई यास सायबर पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी सहा जणांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी बाळासाहेब त्रिबंक यशवंते (वय ५४, व्यवसाय – शासकीय नोकरी, पद – उद्योग सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर) यांनी १ जुलै २०२४ रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले होते की, सीएमईजीपी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने कर्ज व अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार करून बँकेच्या पोर्टलचा गैरवापर केला. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शासकीय रक्कम हडप करून शासनाची फसवणूक करण्यात आली.
सायबर पोलीस स्टेशन, बीड यांनी तांत्रिक तपास करून आरोपींचा माग काढला. त्यानंतर आज गेवराई शहरातून मुख्य आरोपी गोपाल लोखंडे यास अटक करण्यात आली.
ही कारवाई सायबरचे पोलीस निरीक्षक व्ही.यु. घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक, सहाय्यक पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस हवालदार जायभाये, पंचम वडमारे, विजय घोडके, मपोशि काशिद व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.
सायबर पोलिसांनी सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की, ऑनलाईन व्यवहार करताना आलेले फोन व संदेशांची खात्री करूनच व्यवहार करावेत, अन्यथा फसवणुकीचे बळी पडण्याची शक्यता असते.