Breaking

श्री बालाजी शिक्षण मंडळाच्या वतीने गुणवंतांचा सन्मान व कौतुक सोहळा

श्री बालाजी शिक्षण मंडळाच्या वतीने गुणवंतांचा सन्मान व कौतुक सोहळा

WhatsApp Group

Join Now

अंबाजोगाई शहराच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरणामुळे येथून विद्यार्थ्यांची एक आदर्श पिढी निर्माण होते आहे-राजकिशोर मोदी

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोदी लर्निंग सेंटरमध्ये आज नीट, सीईटी,तसेच दहावी व बारावी मध्ये घवघवीत यश मिळवलेल्या अंबाजोगाई शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कौतुक सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई शहरातील शिक्षण हे अत्यंत गुणवत्ता पूर्ण असल्याने येथून विद्यार्थ्यांची एक आदर्श अशी पिढी निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली. प्राचार्य बी आय खडकभावी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्राचार्य एम प्रशांतकुमार,ऍड संतोष पवार, प्रा सविता बुरांडे तसेच डिंपल मोदी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गुणवंतांचा हा सन्मान व कौतुक सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य एम प्रशांतकुमार यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे येथील विद्यार्थ्यांना नेहमीच उच्च तथा गुणवत्ता पूर्वक शिक्षण देत आले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी हा परिपूर्ण होऊनच समाजात बाहेर पडतो असे सांगितले. यावेळी प्राचार्य बी आय खडकभावी तसेच ऍड संतोष पवार यांनी देखील उपस्थिती गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
गुणवंतांचा सन्मान व कौतुक करतांना राजकिशोर मोदी म्हणाले की अंबाजोगाई हे शैक्षणिक परंपरेने समृद्ध असलेले शहर असून, येथून नेहमीच मेहनती, हुशार आणि प्रेरणादायी विद्यार्थी घडले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत दिसून ही आढळून येते.श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे केवळ आपल्याच संस्थेपुरते मर्यादित न राहता शहरातील इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांचाही गौरव वेळोवेळी करत असते आणि यामुळेच खऱ्या अर्थाने शैक्षणिक तथा सामाजिक बांधिलकी जोपासली जात असून बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून अंबाजोगाई परिसरातील सर्व होतकरू विद्यार्थ्यांना CBSE बोर्डाचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे . यामुळे अनेक विद्यार्थी आज वैद्यकीय , इंजिनिअरिंग तसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी नमूद केले. अंबाजोगाई शहर तथा परिसरातील गुणवंत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव करताना आम्हांला अतिशय आनंद होत असल्याची स्पष्टोक्ती देखील मोदी यांनी याप्रसंगी दिली. त्याचबरोबर अंबाजोगाई परिसरातील होतकरू मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची संधी मिळाल्याने आपणास मनस्वी आनंद होत असल्याचे देखील यावेळी राजकिशोर मोदी यांनी नमूद केले.
यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांपैकी उम्मीद फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर लतीफ पठाण तसेच प्राचार्य गणेश तरके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शहराची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याचे कार्य अतिशय उत्तम रित्या होत असल्याचे आवर्जून सांगितले.
या सन्मान तथा कौतुक सोहळ्यात सन 2012 पासून शंभर टक्के निकाल देण्याची न्यू व्हिजन पब्लिक स्कूलची परंपरा याही वर्षी कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये इयत्ता १२ वी मध्ये प्रथम येणारी विद्यार्थिनी पुनम दत्तात्रय चव्हाण (89.40) द्वितीय तेजस्वीनी चंद्रकांत पांचाळ ( 88.20 ) इयत्ता 10 वी मध्ये शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी अभिनव अविनाश मुंडे ( 98.20), द्वितीय सार्थक रत्नेश लोहिया (98.00),हर्षल गजभार (97.20) यांच्या गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेतर्फे विशेष सन्मानामध्ये अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील NEET 2025 मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अंबाजोगाई येथील कन्हैया खंदाडे (632) ऑल इंडिया रँक 215,न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी विराज गणेश तरके ( 587 ) ओबीसी ऑल इंडिया रँक 915,पौर्णिमा प्रविण देशमुख ( 517 ), सार्थ विनय परदेशी (500) येल्डा या ग्रामीण भागातील 60 टक्के अंध असलेली विद्यार्थिनी कु.भाग्यश्री सातपुते (502 ), अंबाजोगाई येथील सद्दाम अलीम शेख ( 500 ),श्रध्दा सचिन दरगड (448) यासोबतच वेदांत सुजित दिक्षितMH CET (99.88% ) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यां सोबतच या गुणवंतांच्या यशामध्ये त्याच्या शाळेतील शिक्षकांचाही सत्कार तथा सन्मान करण्यात आला.

Last Updated: June 20, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.