Breaking
Updated: नोव्हेंबर 5, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : अखेर नगर पालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासोबतच आता अंबाजोगाईतील राजकीय वातावरण अधिक रंजक बनू लागले आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी खरी लढत राजकिशोर मोदी – नंदकिशोर मुंदडा या दोन गटातच होणार आहे. या दोन गटातील तीव्र राजकीय संघर्ष पावलोपावली जाणवू लागला आहे. नगर परिषदेत स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी प्रत्येक प्रभागातून एकमेकाविरोधात तुल्यबळ उमेदवार दिले जात आहेत. परिणामी अनेक प्रभागात जोरदार लढती पहावयास मिळणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक हाय-व्होल्टेज लढत प्रभाग एक मधून होण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग 1 मधून राजकिशोर मोदी यांच्या गटाकडून त्यांचे पुत्र संकेत मोदी निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र सारंग पुजारी यांनी मुंदडा गटाकडून माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम हे निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी स्पष्टपणे प्रभाग सांगितला नसला तरी त्यांचा रोख प्रभाग एक कडेच होता. त्यामुळे नवख्या संकेत मोदी यांच्या विरुद्ध अनुभवी शेख रहीम अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
शेख रहीम : अनुभवी नेतृत्व, समाजमान्यता, संघटनशक्ती
शेख रहीम हे अनेक वेळेस नगरसेवकपदी निवडून आले असून त्यांनी अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष पद देखील भूषवले आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होत्या. त्यांनी रचना मोदी यांना तगडी फाईट दिली होती, मात्र थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. शहराच्या सामाजिक, राजकीय जडणघडणीचा आणि वाटचालीचा शेख रहीम यांना दांडगा अनुभव आहे. शहरातील नियमित समस्या सोडविण्यासोबतच मौलाली पहाड, किरमाणी दर्गा, मुस्लीम समाज स्मशानभूमीच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. स्व. विमलताई मुंदडा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून शहरातील मंडी बाजारात असलेले नागरी रुग्णालय सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ३० वर्षापूर्वी तत्कालीन काळात सुरु असणारी जकात रद्द करून नगरपालिका कर्मचार्यांचे वेतन शासनाकडून मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. शहरात राजकीय, धार्मिक वादाची परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी सलोखा घडवून आणण्यासाठी शेख रहीम नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या पतसंस्थेने देखील अनेक तरुणांना व्यवसायात जम बसविण्यासाठी मदत केली आहे. रुग्णालय असो किंवा पोलीस ठाण्यातील काम शेख रहीम अडचणीत सापडलेल्यांना नेहमीच मदतीचा हात देतात त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग सर्व समाजात आहे. प्रभाग एकचा विचार केला तर इथून लढण्याचा त्यांना पूर्वानुभव आहे. तसेच, प्रभागात मुस्लीम मतदार बहुसंख्येने असल्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो.
संकेत मोदी : शिक्षण, आधुनिक विचार आणि तरुणांची साथ
संकेत मोदी प्रथमच मैदानात उतरले असले तरी त्यांची राजकीय पार्श्वभूमी मजबूत आहे. कुटुंबातील तीन सदस्यांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. वडील राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून राजकारणाचे बाळकडू मिळाले असतानाही त्यांनी सवर्प्रथम उच्च शिक्षणास प्राधान्य दिले. संकेत मोदी यांनी अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली. तिकडे उज्वल करीअरच्या संधी असताना देखील त्यांनी अंबाजोगाईला येऊन थेट राजकारणात न उतरता वडिलांप्रमाणेच आधी शैक्षणिक क्षेत्रात रुची दर्शविली. बालाजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी संस्थेच्या सावर शाळा, महाविद्यालये, व्यावसयिक प्रशिक्षण संस्था यात अमुलाग्र बदल घडविला. मागील काही वर्षात संकेत यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या सर्व शैक्षणिक संस्था वेगाने घोडदौड करत आहेत. संयमित, विनम्र बोलणे, रोखठोक व्यवहार, कार्यतत्परता हे त्यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. शैक्षणिक सोबतच गेल्या काही वर्षात संकटे मोदी हे समाजकारणातही सक्रीय झाल्याचेही दिसून आले आहे. सक्रीय तरुणांचे उत्कृष्ट संघटन यांनी तयार केले आहे. गणेशोत्सवात गणेश मंडळासाठी ढोल-ताशा, लेझीम स्पर्धा आयोजित करण्याचा नवीन पायंडा पडून शहराच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी योगदान दिले आहे. नवरात्र महोत्सवात दांडीया फेस्टिवलच्या माध्यमातून विविध स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. एक गुणी व्यावसायिक, संघटक आणि युवानेता अशी कर्तुत्वाने स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात संकेतला यश आले आहे. नवीन पिढीचे व्हिजन, परदेशातील अनुभव आणि वडिलांचे मार्गदर्शन या जोरावर संकेत मोदी प्रभाग एकमध्ये अमुलाग्र बदल घडवून प्रभागाला एक नंबर बनविण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत. कुटुंबाचा पारंपारिक प्रभाग, राजकिशोर मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे, सर्व समाजात असणारे कौटुंबिक आणि सौहार्दपूर्ण संबंध व सक्रीय तरुणांची टीम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
दोन्ही तगड्या उमेदवारांमुळे या प्रभागातील लढतीला महत्व आले आहे. या दोघांच्या सोबतीने या प्रभागातील दुसऱ्या गटात कोण उमेदवार येतात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. या प्रभागातील सुजाण मतदार अनुभवी, संपर्कक्षम आणि प्रशासनात पारंगत नेतृत्वाची निवड करतात की तरुण, आधुनिक आणि दीर्घकालीन विकासाचे व्हिजन असलेल्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.