Breaking
Updated: मार्च 2, 2026
शोध पथके जावयाच्या मागावर !
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelउद्या जावयाची निघणार गाढवा वरून वरात !
केज :- गावचा जावई म्हणजेच सर्व गावचा जावई अर्थात गावातील समवयस्कांचा मेव्हणा. सुमारे दीडशे वर्षा पूर्वी गावात आलेल्या एका जावयाची त्यांच्या मेव्हण्याच्या थट्टा मस्करीत घडलेली घटना ही गावाची परंपरा झाली. त्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील विडा ता. केज येथील जावयाच्या गर्दभ स्वारीची रंजक कथा. मात्र या परंपरेला दोनदा ब्रेक लागला. मागील वर्षी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आणि त्या पूर्वी सन २०२१ मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे याला दोनदा ब्रेक देण्यात आला होता.
जावई म्हटलं की, त्यांची मर्जी विरूध्द काहीच नाही असा व्यक्ती, त्यांची मर्जी प्रमाणेच सरबराई व पाहुणचार आणि मानमरातब दिला जातो. एक प्रकारे जावयाला सासरवाडीत तळहातावर घेतलं जातं म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु केज तालुक्यातील विडा येथे धुळवडीला जावयाची चक्क गाढवा वरून मिरवणूक काढली जाते. गावातील काहीजण सांगतात की ही परंपरा जवळपास ९० ते ९५ वर्षां पासून सुरू झाली. तर काहीजण म्हणतात १५० वर्षा पासून गावानं जपली आहे. जशी ही परंपरा गंमतदार याची कथाही तशीच गंमतीशीर आहे. धुळवडीला आलेल्या मेव्हण्याची थट्टा मस्करीत गाढवा वरून मिरवणूक काढली ही घटना गावाची परंपरा बनली.
जावयाला घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात येते यात काही नवल नाही. परंतु जावयाला चपलांचा हार घातलेल्या गाढवावर बसवून डी जे लावून पुर्ण गाव त्यावर ठेका धरत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यावर विश्वास बसत नाही ना ? परंतु हे खरं असून अनेक दशका पासून ही परंपरा जपली जाते. यासाठी जावई ही ना नु करत राजी होतात.
या परंपरेची सुरवात कशी झाली त्याचीही कथा गंमतीशीर आहे. विडा हे गाव निजामशाहीतील जहागीरदारांचे गाव. अंदाजे सन १९१५ साली विड्याचे आनंदराव देशमुख यांचे मेहुणे हे धुळवडीला सासरवाडी म्हणजे विडा येथे आलेले होते. जहागीरदारांचे जावई म्हणजे त्यांचा रुबाब ही तसाच ! मेहुण्यांचा पाहूणचाराला ही जोड नाही. या दिवशी थट्टा मस्करीत मेहुण्याची चक्क गाढवा वरून मिरवणूक काढली. ही घटना या गावाची परंपरा बनली.
आता उद्या होणाऱ्या या गर्दभ स्वारीच्या परंपरा कायम ठेवण्यासाठी जावयाच्या शोधात तरुणांची पथके रवाना झाली आहेत. ते मोहीम फत्ते केल्या शिवाय परत येणार नाहीत याची खात्री असल्याने या गावचे जावई मात्र भयभीत झाले आहेत. काही भूमिगत झाले आहेत तर काहींनी आपला मुक्कामच बदलला आहे.
आधी मिरवणूक मग आहेर करून केला जातो सन्मान :- जावयाची गावात गाढवा वरून मिरवणूक काढली जाते यावेळी चप्पल आणि बुटाचा हार गळ्यात घालून वाड्याचा गजरात गावातील प्रमुख रस्त्यावरून मोठ्या हर्षोऊल्हासात मिरवणूक मिरवणूक काढली जाते. त्या नंतर मात्र मिरवणूक संपल्या नंतर जावयाला कपड्याचा आहेर करून त्यांचा सन्मान केला जातो. अशी ही परंपरा आहे.
___________________________________________
या परंपरेला लागला दोनदा ब्रेक :- सन २०२१ मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या काळातील लॉक डाऊनमध्ये याला पहिला ब्रेक बसला. त्या नंतर ९ डिसेंबर २०२४ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादाच्या खंडणीसाठी ते आडवे येत असल्याच्या संशया वरून पशु पेक्षाही जास्त क्रूर पद्धतीने आणि अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे विडा ग्रामस्थांनी या वर्षी देशमुख परिवाराच्या दुःखात सहभागी होत मागील वर्षी जावयाच्या गर्दभ स्वारीच्या ही परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली होती.
मागील चार वर्षा पूर्वी या जावई कसे ताब्यात घेतले ? याची सुरस कथा :-
सन २०२०
अन मटणाने घात केला…. :-
दरम्यान धुलिवंदनिमित दत्तात्रय गायकवाड हे सकाळच्या सुमारास मटण घेण्यासाठी आले होते. मटण घेऊन ते मस्साजोगच्या बसस्थानकावर आल्यानंतर विड्यातील काही तरुणांनी त्यांना उचलून घेऊन गेले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दत्तात्रय यांचा मटणाने घात केला होता.
______________________________________
सन २०२२ :-
बँकेत कामाला असलेले जावई सासरवडीच्या तिजोरीत झाले जमा :- श्रीमंतराव देशमुख यांचे जावई अमृत धनंजय देशमुख रा. रातरंजन ता. वैराग जि. सोलापूर हे केज येथील वसुंधरा बँकेचे कर्मचारी यांना ताब्यात घेतले आणि त्यांना गर्दभ सावारीचा मान मिळाला होता.
सन २०२३ :-
साप निघाल्याच्या खोट्या बनावाला अविनाश करपे फसले :- होळीच्या रात्री एक पथक जवळबन येथे पोहोचले पण अविनाश करपे यांना जाळ्यात फसवायाचे कसे? म्हणून एकाने शक्कल लढवली आणि दारात साप निघाला म्हणून हाक मारली. त्याला अविनाश फसले अन घराबाहेर येताच त्यांना ताब्यात घेऊन रात्री विड्यात घेऊन आले होते.
सन २०२४
तिघांनी काढली दमछाक काढली पण शेवटी एकजण सापडलाच :- बुरुंडवाडी येथील अशोक सोनवणे हे विडा येथील अंकुश पवार यांच्या जावयाला ताब्यात घेतले होते. मात्र सायंकाळी ६:०० वा अशोक भोसले हे सर्वांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले. गाढवावर बसवून मिरवणुकीची तयारी सुरू करण्या पूर्वीच गावकऱ्यांनी ताब्यात घेतलेला मेकॅनिक जावई बहाद्दर निघाला. त्याने गावकऱ्यांना गुंगारा देऊन परांगदा झाले. मात्र त्या नंतर गावकऱ्यांनी चक्क एका वकील जावईच ताब्यात घेतला. मात्र वकील जावयाने बुद्धी चातुर्याने गावकऱ्या सोबत युक्तिवाद करून सुटका करून घेतली. मग मात्र गावकरी हैराण झाले. विडा गावाजवळ असलेल्या शिंदी येथील संतोष उर्फ पप्पू जाधव या तिसऱ्या एका जावयाला पकडून आणण्याचा सापळा लावला; पण याची कुणकुण त्या जावयाला लागताच ते शेतात जाऊन लपून बसले होते. मात्र त्या नंतर संतोष जाधव हे चहा पिण्यासाठी गावातील हॉटेलवर गेले आणि नेमके त्याच वेळी त्यांना पकडले. तरीही त्यांनी सासरवाडीकच्या लोकांना थाप मारून पळून जाऊन ते शेतात लपून बसले. पण गावात दूध विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडून त्यांनी माहिती घेतली व पुन्हा त्यांना पकडून नेले होते.