Breaking
Updated: सप्टेंबर 22, 2025
पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक झाला पलटी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज : पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात आदळून कलरचे डब्बे घेऊन जाणारा ट्रक हा वळणावर रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात कॅबिनचा चक्काचूर होऊन अडकलेल्या ट्रक चालकास पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत दोन तास प्रयत्न करीत बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना कळंब – अंबाजोगाई रस्त्यावर सुकळी (ता. केज) येथे रविवारी रात्री घडली.
पश्चिम बंगाल राज्यातील ट्रक चालक सिकंदर हा ट्रकमध्ये (डब्ल्यू बी २३ सी ७९१८) ऑइल पेंटचे डब्बे भरून कळंब – अंबाजोगाई रस्त्यावरून रविवारी रात्री जात असताना सुकळी येथील वळणावर पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात ट्रक आदळून ट्रकमधील ऑईल पेंटच्या डब्याच्या हेलकाव्याने संतुलन ढळल्याने ट्रक रस्त्याच्या खड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा चकनाचूर होवून स्टिअरिंगमध्ये ट्रक चालक गंभीर जखमी अवस्थेत अडकला होता. तर सर्वत्र ऑईल पेंट सांडल्याने त्याचा चिखल झालेला होता. या घटनेनंतर युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे फौजदार भिमराव मांजरे, फौजदार भारत बर्डे, जमादार संपत शेंडगे, पोलिस नाईक हनुमंत गायकवाड यांनी स्वतःच जीव धोक्यात घालून आणि काट्या कुट्यांची पर्वा न करता कपडे व अंग ऑईल पेंटने माखलेले असताना दोन तास अथक प्रयत्न करीत ट्रक चालक सिकंदर याला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. तर त्यांना अमोल राऊत, आकाश बचुटे, किरण बोराडे, राजाभाऊ बचुटे, विनायक बोराडे, प्रवीण बचुटे, अजय सोळुंके, दत्ता कदम, अविनाश भिसे यांनी मदत केली.
दरम्यान, तहसीलदार राकेश गिड्डे, केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी रुग्णवाहिका, जेसीबी, अग्निशामक दलाशी सतत संपर्क साधून मदत केली. तर रुग्णवाहिकेस घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. तर पाईपलाईनसाठी विना परवानगी रस्ता खोदणाऱ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.