Breaking

सत्याचा मोर्चा विरोधाचा नव्हे, जागृतीचा-जबाबदारीचा आवाज

Updated: नोव्हेंबर 1, 2025

By Vivek Sindhu

सत्याचा मोर्चा विरोधाचा नव्हे, जागृतीचा-जबाबदारीचा आवाज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शरद पवारांकडून ऐतिहासिक संदर्भ देत संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी तुलना

मुंबई – मुंबईत आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली. मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे.

मोर्चातील मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू-भगिनी, तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो, असं सांगत त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संदर्भ जोडला. पवार म्हणाले की, आजचा मोर्चा मला 1978-89 च्या काळात घेऊन जातो. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात असेच मोर्चे निघाले होते. त्या काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज तुमच्यात दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीचा सामूहिक आवाज आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे, जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज

मोर्चाच्या अखेरीस शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देण्याचं आवाहन केलं. ही लढाई कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला. सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज असल्याचं ते म्हणाले. या मोर्चातून राज्यभरात लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे.


Categories

Recent Posts