Breaking
Updated: सप्टेंबर 29, 2025
सरसकट पंचनामे करा ; कोणाच्याही नुकसानीची नोंद राहणार नाही याची काळजी घ्या - आ. नमिता मुंदडा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबत सर्व विभागाच्या कार्यालय प्रमुखांच्या नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीचे आयोजन आ. नमिता मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात काल सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. यावेळी आ. मुंदडा या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे , तहसीलदार राकेश गिड्डे , जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा , कृउबा चे उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर , भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार , नेताजी शिंदे , सुनील गलांडे , वसंत केदार ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी , भाजयुमो चे राहुल गदळे , शरद इंगळे , प्रकाश जाडकर , खदिर खुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती
पुढे बोलताना आ. मुंदडा म्हणाल्या की, तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या तलावांचे नुकसान झाले असण्याची शक्यता लक्षात घेत त्यांचे सर्वेक्षण तिन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या दोनच दिवसात करावे. रस्ते, शाळा, पुल, विद्युतपोल आदींच्या नुकसानीचेही प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्या. जमीन खरडून गेलेल्या क्षेत्राबरोबरच नदीशेजारी असलेल्या उसाच्या नुकसानीचेही पंचनामे करावेत अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या . तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या विभागाचे झालेल्या नुकसानीचे अहवाल विहित वेळेत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा. हे अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत की नाही याची देखील खातरजमा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावर काही अडचणी असतील, तर त्या कळवा त्यावर आपण लागेल ती मदत करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच या आव्हानात्मक परिस्थितीत तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तळमळीने केलेल्या कामाचे आ. नमिता मुंदडा यांनी यावेळी कौतुकही केले.
तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान होऊन हतबल झाल्याने आत्महत्या केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत, पशुधनाच्या नुकसानीच्या वीस घटना नोंद झाल्या आहेत. घरांच्या पडझडीच्या छत्तीस घटना घडल्या असून चाळीस विहिरींचे नुकसान झाले आहे. तर एकशे त्रेचाळीस घरात पुराचे पाणी जाऊन त्या कुटुंबाना तात्पुरते स्थलांतरित करण्यात येऊन प्रत्येक कुटुंबास पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. तर शेतजमीन पुराच्या पाण्याने खरडून गेल्याचे 557 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. तर शेतातील ठिबक, सोलार व पाईप यांच्याही नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी यावेळी दिली.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे जनावरे दगावली असून काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकरी व नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून धनादेशाचे वाटप आ मुंदडा यांच्या हस्ते यानिमित्ताने करण्यात आले.
या बैठकीस गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे , कृषी अधिकारी सागर पठाडे , ता आरोग्य अधिकारी गवळी , नपचे मुख्याधिकारी अजित ढोपे , उपजिल्हारुग्णालयाचे डॉ दत्तात्रय केंद्रे , व सर्वच विभागप्रमुखांची उपस्थिती होती