Breaking
Updated: सप्टेंबर 29, 2025
शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनास अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : तालुक्यातील गित्ता शिवारातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आणि संयुक्त मोजणीस जोरदार विरोध दर्शविला आहे. सोमवारी (दि.२९) शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे निवेदन देत विरोध नोंदविला आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शक्तीपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपूर ते गोवा) या मार्गासाठी गित्ता शिवारातील जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. ही जमीन अत्यंत उपजाऊ, बागायती व उच्च प्रतीची असल्याने ती संपादन झाल्यास उपजीविकेचे एकमेव साधन गमावले जाईल. परिणामी कुटुंब उध्वस्त होईल व जगण्याचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सदरील शक्तीपीठ महामार्ग हा केवळ अनावश्यक प्रकल्प असून स्थानिक जनतेस याचा काहीही फायदा होणार नाही. याच्या समांतर आधीच नागपूर-रत्नागिरी आणि नांदेड-कोल्हापूर हे राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात व वापरात आहेत. त्यामुळे नवीन महामार्ग उभारण्याची आवश्यकता नाही. यासाठी लोकांची कोणतीही मागणी नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
यावेळी महामार्ग बढती शेतकरी गोविंद पंढरी इरलापल्ले यांनी “माझ्या जमिनीतील एक इंचही भाग मी शासनाला देण्यास तयार नाही. शासनाकडून माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने संयुक्त मोजणी किंवा सिमांकन होऊ नये. सदर महामार्ग रद्द करण्यासाठी शासनास आपण शिफारस करावी,” अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांच्यासोबतच इतर शेकडो बाधित शेतकऱ्यांनी देखील सदरील निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आपला विरोध दर्शविला आहे.
शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भूमी संपादन प्रक्रियेला ठाम विरोध दर्शविल्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबद्दलचा वाढता रोष समोर आला आहे. आता या संदर्भात प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.